Virat Kohli Creates History in IPL: विराट कोहलीने आयपीएलमध्ये आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आज रायपूरमध्ये खेळवला जात आहे. पावसामुळे हा सामना उशिराने सुरू झाला. ७.३० वाजता सुरू होणारा हा सामना ८.४५ ला सुरू झाला आहे. प्लेऑफच्या दृष्टीने सर्व सामने महत्त्वाचे असणार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात दोन बदल केले आहेत. व्यंकटेश अय्यर रोमारिओ शेफर्डच्या जागी खेळणार आहे, तर जेकब डफीला सुयश शर्माऐवजी प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आरसीबीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. केकेआरविरूद्धचा सामना जिंकल्यास संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित करेल.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा हा सामना विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील २७९वा सामना ठरला. यासह तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्या संयुक्तपणे नावावर होता. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनीने २०२५ हंगामातील गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात २७८ सामन्यांचा टप्पा गाठला होता. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी १० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात एकत्रितपणे या विक्रमाशी बरोबरी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू:
विराट कोहली – २७९ सामने – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
महेंद्रसिंह धोनी – २७८ सामने – चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स
रोहित शर्मा – २७८ सामने – डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स
रवींद्र जडेजा – २६५ सामने – राजस्थान रॉयल्स, कोची टस्कर्स, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स
दिनेश कार्तिक – २५७ सामने – दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स
शिखर धवन – २२२ सामने – दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज</p>
विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचाही विक्रम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्याने सर्वाधिक सामने खेळले असून, एका फ्रँचायझीसाठी २५० हून अधिक सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी २४८ सामने खेळले आहेत. तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी २३२ सामने खेळून तिसऱ्या क्रमांकावर आहे.
