Virat Kohli Creates History in England: कार्डिफच्या मैदानावर क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका सुवर्णअध्यायाची भर पडली आहे. भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ असलेल्या विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर असा एक टप्पा गाठला आहे, जो आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाला गाठता आलेला नाही. माजी कोच व खेळाडू राहुल द्रविड यांना मागे टाकत विराटने अनोख्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एक शानदार चौकार मारताच, त्याने दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड यांच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडीत काढला. आता इंग्लंडच्या भूमीवर सर्व प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून कोहलीचं नाव अग्रस्थानी पोहोचलं आहे.

या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहलीला सामन्यापूर्वी केवळ ४ धावांची गरज होती. भारताच्या डावातील नवव्या षटकात, जोफ्रा आर्चरने चौथा चेंडू टाकला, विराटच्या बॅटमधून निघालेल्या एका शानदार स्ट्रेट ड्राईव्हने केवळ चेंडू सीमारेषेबाहेरच धाडला नाही, तर इतिहासाच्या पानांवर स्वत:च नाव सर्वोच्च स्थानी कोरलं.

विराट कोहलीने २०११ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी पोहोचला होता आणि २०१६ पर्यंतचा त्याचा तिथला प्रवास महत्त्वपूर्ण चढ-उतार तसेच संघर्षांनी भरलेला राहिला आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण ५९ सामने खेळले असून, ७५ डावांमध्ये २,६४६* धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ४०.०३ इतकी राहिली असून, त्याने तीन शानदार शतकं आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडमधील त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १४९ धावा आहे.

दुसऱ्या स्थानी भारतीय क्रिकेटमधील सर्वात भरवशाच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविडने १९९६ ते २०११ या काळात इंग्लंडमध्ये आपलं वर्चस्व गाजवलं. त्याने तिथे केवळ ४६ सामन्यांमधील ५६ डावांत ५५.१० ची जबरदस्त सरासरी राखत २,६४५ धावा केल्या. द्रविडने इंग्लंडमध्ये ८ शतकं आणि १५ अर्धशतकं झळकावली, तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या २१७ होती. आता विराट त्या २,६४५ धावांच्या मोठ्या आकड्याला मागे टाकून भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा टप्पा गाठला आहे.

इंग्लंडमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

विराट कोहली – ५९* सामने – २६४६* धावा
राहुल द्रविड – ४६ सामने – २६४५ धावा
सचिन तेंडुलकर – ४३ सामने – २६२६ धावा
रोहित शर्मा – ४८* सामने- २३०८* धावा