Virat Kohli Creates History in IPL: धरमशालाच्या नयनरम्य मैदानावर आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात हा सामना होत आहे. पंजाबचा संघ जिंकला तर ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतील आणि आरसीबी जिंकली तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरतील. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने आपल्या सावध परिणामी आक्रमक खेळीच्या बळावर नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रजत पाटीदारच्या अनुपस्थितीत आजच्या सामन्यात जितेश शर्मा संंघाचं नेतृत्त्व करत आहे. पंजाब किंग्सने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीला फलंदाजीसाठी पाचारण केलं. आरसीबीकडून विराट कोहली व जेकब बेथलची जोडी फलंदाजीला उतरली. यासह विराटने १६ धावा करताच यंदाच्या आयपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पा पूर्ण केला.

विराटने सलग चौथ्यांदा आयपीएलमध्ये ५०० अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली हा आयपीएल इतिहासात एकाच सीझनमध्ये सर्वाधिक वेळेस ५०० अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. विराटने ९ वेळा एका हंगामात ५०० अधिक धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्न आणि केएल राहुल आहेत. ज्यांनी ७ वेळा एका सीझनमध्ये ५०० अधिक धावा केल्या. तर शिखर धवनने ५ वेळा ही कामगिरी केली.

विराट कोहलीने या सर्व दिग्गजांना खूप मागे टाकले आहे. इतकेच नाही, तर वयाची ३५ वर्षे ओलांडल्यानंतरही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. ३५ वर्षांचा झाल्यापासून त्याने तीन वेळा आयपीएलच्या एका हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटने पंजाबविरूद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. तर ३७ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा करत माघारी परतला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०० धावा

९ वेळा – विराट कोहली
७ वेळा – डेव्हिड वॉर्नर<br>७ वेळा – केएल राहुल
५ वेळा – शिखर धवन

पंजाब किंग्सविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज – विराट कोहली

विराट कोहली पंजाब किंग्ससाठी नेहमीच धोकादायक ठरला आहे. या सामन्यादरम्यान, त्याने पंजाबविरुद्ध आपल्या आयपीएल कारकिर्दीत ११७५ पेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या, जो एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. पंजाब व्यतिरिक्त, विराटने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ११७४ आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ११७२ धावा देखील केल्या आहेत.