IPL 2026 Virat Kohli Record vs Mumbai Indians: वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात अटीतटीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना वादळी फटकेबाजी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची धुलाई करत १७व्या षटकात आरसीबीने २०० धावांचा पल्ला गाठला. या सामन्यात विराट व फिल सॉल्ट यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर किंग कोहलीने मुंबई इंडियन्सविरूद्ध मोठ्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.

विराट कोहली व फिल सॉल्टने मुंबईविरूद्ध फलंदाजीला दणक्यात सुरूवात करून दिली. फिल सॉल्ट व विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १२० धावांची भागीदारी रचली. फिल सॉल्टने वादळी फटकेबाजी करत ३६ चेंडूत ७८ धावा केल्या. तर विराट कोहलीने मैदानावर एका टोकाकडून सावधपणे आपली खेळी साकारली आहे. विराटने ३८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान विराटने मोठा विक्रम आपल्या नावे केला.

विराट कोहलीने या सामन्यात खेळीदरम्यान विराटने मुंबई इंडियन्सविरुद्ध १ हजार धावा पूर्ण केल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध १ हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग (CLT20) या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून मुंबई इंडियन्सविरुद्ध या धावा केल्या. या सामन्यात विराटने शानदार फलंदाजी केली आणि फिल सॉल्टसोबत मिळून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.

टी-२० फॉरमॅटमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुलचं नाव आहे. केएल राहुलने मुंबईविरुद्ध २१ सामन्यांमध्ये ९७७ धावा केल्या आहेत. या यादीत शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध २८ टी-२० सामन्यांमध्ये ९०१ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८८८ धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने ८५० धावा केल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली: १०१९* धावा
केएल राहुल: ९७७ धावा
शिखर धवन: ९०१ धावा
अजिंक्य रहाणे: ८८८ धावा
सुरेश रैना : ८५० धावा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या जोडीने ६५ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. ३६ चेंडूंमध्ये ७८ धावा करून बाद झालेल्या फिल सॉल्टच्या रूपाने आरसीबीला पहिला धक्का बसला. सॉल्ट आणि कोहली यांच्यातील १२० धावांची भागीदारी ही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीची दुसरी सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे; यापूर्वी २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये फॅफ डु प्लेसिस आणि कोहलीने पहिल्या विकेटसाठी १४८ धावा जोडल्या होत्या.