Virat Kohli Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आरसीबीने आतापर्यंत चॅम्पियनसारखा खेळ केला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौचा डाव अवघ्या १४६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २९ चेंडू शिल्लक ठेवून आणि ५ गडी राखून आपल्या नावावर केला. यादरम्यान ४९ धावांवर बाद होणाऱ्या विराटने मोठा रेकॉर्ड केला आहे.
धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचं गणित कधीच चुकत नाही. त्यामुळेच त्याला चेजमास्टर म्हणतात. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर १४६ धावांचा पाठलाग करणं काही मोठं काम नाही. कारण या मैदानावर २०० हून अधिक धावांचाही यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. या धावांचा पाठलाग करताना विराट इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला. त्याने ६ चौकार आणि १ षटकार खेचला. तसेच एकेरी दुहेरी धावा घेऊन तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला. पण जेव्हा अर्धशतकापासून एक धाव दूर होता, त्यावेळी तो आवेश खानच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.
विराट ४९ धावांवर बाद होऊन हे फार दुर्मिळ आहे. कारण स्पर्धेतील १९ हंगामात तो पहिल्यांदाच ४९ धावांवर बाद झाला आहे. याआधी तो एकदाही ४९ धावांवर बाद झाला नव्हता. त्याला आयपीएल स्पर्धेत २७१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३९.८ च्या सरासरीने ८८४० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६५ अर्धशतकं आणि ८ शतकं झळकावली आहेत. २७१ वेळा फलंदाजीला येऊन तो केवळ एकदाच ४९ या आकड्यावर बाद झाला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दमदार विजय
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा डाव १४६ धावांवर आटोपला. लखनौकडून फलंदाजी करताना मिचेल मार्शने ४० धावा केल्या. तर मुकुल चौधरीने ३९ धावा केल्या आणि आयुष बदोनीने ३८ धावांची खेळी केली. १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने २७ धावा केल्या. जितेश शर्माने २३ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना २९ चेंडू शिल्लक ठेवून आणि ५ गडी राखून आपल्या नावावर केला.
