Virat Kohli Credits Rahul Dravid For Comeback after Captaincy saga: माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाही स्वतःला सतत ‘इम्पोस्टर सिंड्रोम’शी झुंज द्यावी लागत असल्याचा खुलासा केला आहे. तसेच, कर्णधारपदाच्या प्रचंड मानसिक ताणानंतर स्वतःला सावरण्यात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांनी मोठी भूमिका बजावल्याचंही त्याने सांगितलं. विराट कोहलीने भारतीय संघाच्या कर्णधारपदानंतरच्या कठीण काळात साथ दिल्याबद्दल राहुल द्रविड आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मनापासून आभार मानले.
विराटचा भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ वादग्रस्त पद्धतीने संपला होता. त्याने प्रथम टी-२० संघाचं नेतृत्व सोडलं, त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि काही महिन्यांनी त्याने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. याच काळात राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली होती. विराट त्या वेळी फलंदाजीतही अत्यंत खराब फॉर्ममधून जात होता. तब्बल तीन वर्षे त्याच्या बॅटमधून आंतरराष्ट्रीय शतक आलं नव्हतं. अशा कठीण टप्प्यात द्रविड आणि विक्रम राठोड यांनी परिस्थिती समजून घेत त्याला मानसिकदृष्ट्या सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असं विराटने सांगितलं.
राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला मानसिकरित्या पाठिंबा देत कसं सावरलं?
“राहुल भाई आणि विक्रम राठोड यांच्याबद्दल मी अनेकदा बोललो आहे. कसोटी क्रिकेटमधला माझा सर्वोत्तम काळ होता आणि आजही जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी माझी ज्या पद्धतीने काळजी घेतली, त्यामुळे मला त्यांच्यासाठी खेळावंसं वाटायचं. त्यांच्यासाठी मेहनत घ्यावी, संघर्ष करावा आणि मैदानावर स्वतःचं सर्वस्व द्यावं असं वाटायचं.
“राहुल (द्रविड) भाई आणि विक्रम राठोड यांच्याबद्दल मी अनेकदा बोललो आहे. तो कसोटी क्रिकेटमधला माझा सर्वोत्तम काळ होता आणि आजही जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी माझी ज्या पद्धतीने काळजी घेतली, त्यामुळे मला त्यांच्यासाठी खेळावंसं वाटायचं. त्यांच्यासाठी मेहनत घ्यावी, संघर्ष करावा आणि मैदानावर स्वतःचं सर्वस्व द्यावं असं वाटायचं. ते खूप काळजी घेणारे आणि प्रेरणा देणारे होते. त्यांनी मला माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाची आणि यशाची सतत जाणीव करून दिली. खेळाडू म्हणून आपण कधी शांत बसून मागे वळून पाहत नाही. आपण काय साध्य केलंय, याचा विचारच करत नाही,” असं विराट कोहलीने मंगळवारी (१९ मे) बंगळुरूमध्ये झालेल्या ‘आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’मध्ये बोलताना सांगितलं.
कोहली पुढे म्हणाला, “खेळाडू म्हणून तुम्ही कायम आत्मविश्वास आणि असुरक्षितता यांच्या मधल्या खूप बारीक रेषेवर चालत असता. मनात सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे चांगले नाही. तो ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ कायम मनात असतो. आजही जेव्हा मी नेट्समध्ये सरावाला जातो, तेव्हा मनात विचार येतो की हे तरुण खेळाडू माझ्याकडे पाहत आहेत. जर माझं सराव सत्र खराब गेलं, तर कदाचित ते विचार करतील ‘हा तोच खेळाडू आहे का, जो २० वर्षांपासून क्रिकेट खेळतोय?’ हा विचार कायम डोक्यात असतो.”
माजी भारतीय कर्णधाराने पुढे सांगितलं, “राहुल भाईंना माझी ती भावना समजत होती, कारण त्यांनी स्वतःही सर्वोच्च स्तरावर हे सगळं अनुभवलं होतं. विक्रम राठोडही अनेक वर्षे क्रिकेटसोबत जोडलेले होते. त्यामुळे मी काय अनुभवत होतो, हे त्यांना पूर्णपणे समजत होतं त्यांनी मानसिकदृष्ट्या पाठिंबा दिला आणि मनापासून काळजी घेतली, त्यामुळे मी पुन्हा क्रिकेटचा आनंद घेऊ लागलो.
भारतीय संघाचं नेतृत्त्व करण्याबाबत विराट काय म्हणाला?
कोहलीने पुढे दीर्घकाळ भारतीय संघाचं नेतृत्व करताना मानसिकदृष्ट्या किती मोठा ताण सहन करावा लागला, याबद्दलही खुलासा केला. “कर्णधार म्हणून काम करताना तुम्हाला कायम अशा मानसिकतेत राहावं लागतं, जिथे तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. कोणी तुम्हाला ‘तू ठीक आहेस ना?’ असं विचारेल का, हा विचारसुद्धा मनात येत नाही. नंतर मागे वळून पाहिल्यावर मला जाणवलं की जवळपास नऊ वर्षे कुणी मला खरंच हा प्रश्न विचारलाच नव्हता की, ‘तू कसा आहेस?’ पण त्या काळात मी इतका जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेलो होतो की मला स्वतःलाही कुणीतरी हा प्रश्न विचारावा, अशी गरज कधी भासली नाही. मी सगळं स्वतः सांभाळत होतो आणि त्यात ठीकही होतो,” असं विराट म्हणाला. कोहलीने शेवटी स्पष्ट केलं की, “प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला पुन्हा तीच वेळ आली तरी मी हे सगळं याच पद्धतीने करेन.”
