Virat Kohli on Breaking Records: किंग कोहलीने आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यात विक्रमी शतक झळकावलं. विराटने अवघ्या ५८ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह शतकाचा पल्ला गाठला आणि या खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. विराटने जणू विक्रमांची चळत लावली. कुठे विश्वविक्रम, कुठे भारतासाठीचा विक्रम तर आयपीएलमधील शतकांचा आकडा असो. सगळीकडे किंग कोहली अव्वल स्थानी आहे. या विक्रमी खेळी करण्याबद्दल विराटला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याने भावुक करणारं उत्तर दिलं.
विराट कोहलीने त्याच्या शतकी खेळीदरम्यान टी-२० इतिहासात १४ धावांचा टप्पा गाठला. टी-२०मध्ये सर्वात कमी डावांत १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. शिवाय भारतासाठी टी-२०मध्ये १४ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला. टी-२० इतिहासात भारतासाठी सर्वाधिक १० शतकं त्याच्या नावावर आहेत.
विराटला शतकी खेळीनंतर विचारण्यात आलं की, तुला आजच्या खेळीदरम्यान सर्वात जास्त काय भावलं, यावर विराट म्हणाला, “मला सर्वात जास्त आनंद माझ्या क्रीजवरील स्थिरतेचा झाला. मी कोणताही अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त माझ्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवला. भरपूर चौकार मारले, गॅप्स शोधले आणि कोणत्या लेंथच्या चेंडूंवर षटकार मारायचे हे पूर्णपणे स्पष्ट होतं. मी सतत सामन्यात राहण्यावर भर दिला, भरपूर डबल्स घेतल्या, गरजेनुसार चौकार मारले, चेंडूची लेंगथ ओळखून माझ्या आवडीच्या भागात फटके खेळले. त्यामुळे मला आनंद झाला की मी माझ्या खेळावर विश्वास ठेवला आणि जे फटके मी नेहमी खेळतो, ते सर्वोत्तम पद्धतीने अंमलात आणू शकलो.”
विराट कोहली शतकानंतर काय म्हणाला?
विराटने या खेळीदरम्यान अनेक विक्रम मोडले, असे मोठे विक्रम मोडल्यानंतर कसं वाटतंय, असं विचारताच विराटने उत्तर दिलं, “मला बॅटिंग करायला प्रचंड आवडते. बॅटिंग करणं हे अजूनही माझ्या मनाच्या केंद्रस्थानी आहे. या स्तरावर खेळणं ही मोठी सन्मानाची गोष्ट आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध अजूनही स्पर्धा करता येतेय, हे माझ्यासाठी खूप खास आहे.”
“मी आयुष्यभर फक्त क्रिकेटच खेळलो आहे आणि या खेळावर मी मनापासून प्रेम केलंय. त्यामुळे मैदानावर फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण, मी माझं संपूर्ण मन आणि आत्मा त्या खेळात झोकून देतो. कारण एक दिवस हे सगळं संपणार आहे. तोपर्यंत मैदानावरचा प्रत्येक दिवस पूर्णपणे जगायचा, मजा घ्यायची आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा, असं मला वाटतं. मला दडपणाच्या परिस्थिती आवडतात. जिथे थोडी घालमेल जाणवते, तिथे स्वतःलाच आव्हान देत मी म्हणतो, ‘जा आणि पूर्ण ताकदीने खेळ.’”
“जेव्हा तुम्ही अशा दबावाच्या परिस्थितीत यशस्वी होता, तेव्हा तुम्ही अधिक चांगले खेळाडू बनता. खेळ तुम्हाला फक्त क्रिकेट नाही, तर आयुष्याबद्दलही खूप काही शिकवतो. दडपणाखाली सातत्याने चांगली कामगिरी करताना तुमचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. इतकी वर्षं, इतके विक्रम आणि आकडे असूनही माझ्यासाठी अजूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खेळावरचं प्रेम. अजूनही बॅटच्या मधोमध चेंडू लागण्याचा आनंद तसाच आहे आणि हे सगळं देवाच्या कृपेने शक्य झालं आहे. त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे,” विराटच्या या वक्तव्याने त्याचं क्रिकेटवरील प्रेम स्पष्ट दिसून आलं.
