रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएल स्पर्धेचं पहिलं जेतेपद पटकावण्यासाठी १८ वर्ष लागली. गेल्या वर्षी पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या आरसीबीने सातत्यपूर्ण खेळासह सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदावर कब्जा केला. सर्वसमावेशक सांघिक प्रदर्शन हे आरसीबीच्या दमदार विजयाचं वैशिष्ट्य राहिलं. आरसीबीने प्राथमिक फेरीत अव्वल स्थान राखत प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला. क्वालिफायर १च्या लढतीत गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत त्यांनी दिमाखात फायनल गाठली. पुरेशी विश्रांती आणि सरावानंतर रविवारी झालेल्या फायनलमध्ये आरसीबीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर खणखणीत खेळ करत बाजी मारली. अनेक वर्ष जेतेपदापासून दूर राहिलेल्या आरसीबीने आता मात्र मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सलग जेतेपदं पटकावणाऱ्या संघाच्या यादीत स्थान पटकावलं आहे.

रजत पाटीदारचं सक्षम नेतृत्व आणि फलंदाजी

टी२० प्रकारात नेतृत्व हा काटेरी मुकूट आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारने सलग दुसऱ्या वर्षी आरसीबी जेतेपद मिळवून दिलं. शांत,मितभाषी रजतने प्रत्येक सामन्यात संघाची सूत्रं सक्षमपणे सांभाळली. गोलंदाजीतले बदल असोत किंवा क्षेत्ररक्षणात बदल- नियमितपणे सामन्यातल्या परिस्थितीचं भान ठेऊन त्याने अचूक निर्णय घेतले. एखाद्या गोलंदाजाने खूप धावा दिल्यास त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला प्रोत्साहन देण्यात रजत आघाडीवर असे. कर्णधारपदाच्या जबाबदारीचा परिणाम होऊ न देता रजतने १५ सामन्यात १९२.६९च्या स्ट्राईकरेटने ५०१ धावा काढल्या. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रजतने शतकांची पर्वा केली नाही. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यावर त्याने भर दिला. आधीच्या हंगामांमध्ये विराटच्या खेळात नेतृत्वाचं ओझं जाणवत असे. रजतने सलग दोन वर्ष खंबीरपणे नेतृत्व केलं आहे.

कोहलीचा अद्भुत फॉर्म आणि फिटनेस

विराट कोहली आणि आरसीबी हे समानार्थी शब्द आहेत. २००८ पासून विराट सगळे हंगाम आरसीबीसाठी खेळला आहे. गेल्या वर्षी विराटचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं. यंदा विजयी फटका लगावत जेतेपद पटकावण्याचं विराटचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. विराटने आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी२० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. तो भारतातही नसतो. पण सलग दोन महिने प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेत चाळिशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या विराटने अद्यापही धावांची भूक तितकीच असल्याचं सिद्ध केलं. टी२० प्रकारातली फलंदाजी दिवसागणिक बदलत असताना विराट आजही कालसुसंगत असल्याचं दाखवून दिलं. १६ सामन्यात विराटने १६५.८४च्या स्ट्राईकरेटने खेळताना ६७५ धावा चोपून काढल्या. सलामीला येत पॉवरप्लेचा फायदा उठवत विराटने मनमुराद फटकेबाजी केली. फिल सॉल्ट आणि त्यानंतर वेंकटेश अय्यरच्या साथीने दमदार भागीदाऱ्या रचल्या. चौकार, षटकारांची लयलूट होत नाही तेव्हा एकेरी,दुहेरी धावांवर भर देत संयमी खेळी केल्या. समकालीन खेळाडू निवृत्ती घेऊन बाजूला झालेले असताना विराटचा फिटनेस आणि खेळातलं सातत्य अद्भुत दर्जाचं होतं.

हेझलवूड-भुवी-रसिख सलाम, त्रिकुटाची कमाल

batsmen win you matches, bowlers win you tournaments ही उक्ती आरसीबीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी उंचपुरा जोश हेझलवूड, अनुभवी आणि निष्णात भुवनेश्वर कुमार, युवा आणि अचूक शिस्तबद्ध गोलंदाजी करणारा रसिख सलाम, बाऊन्सर फेकून फलंदाजांना बुचकळण्यात टाकणारा कृणाल पंड्या आणि आलटून पालटून खेळणारे रोमारिओ शेफर्ड आणि सुयश शर्मा यांनी अफलातून कामगिरी करत आरसीबीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. नकलबॉल, स्लोअरवन, बाऊन्सर, यॉर्कर अशी सगळी अस्त्रं वापरून फलंदाजांना त्रास देणारा भुवनेश्वर कुमार आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार म्हटल्यास वावगं ठरू नये. हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजाला परपल कॅपने गौरवण्यात येतं. अवघ्या एका विकेटने भुवनेश्वरची कॅप हुकली. २८ विकेट्ससह भुवनेश्वरने आताही भारतीय संघात स्थान पटकावू शकतो हा विश्वास दिला आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं अशा दोन्ही आघाड्या रसिख सलामने समर्थपणे सांभाळल्या. टिच्चून मारा करण्यात पटाईत जोश हेझलवूड आणि स्पर्धेच्या पूर्वाधात तो नसताना खेळणाऱ्या जेकब डफी यांनी आरसीबीच्या अनेक विजयांचा पाया रचला. षटकार, चौकारांची चर्चा होत असताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अजेय कामगिरी केली.

कृणाल पंड्याची अष्टपैलू भूमिका

जेतेपद पटकावणाऱ्या संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मंडळींमध्ये कृणाल पंड्याचा समावेश होतो. अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग राहिलेल्या कृणालने यंदाही आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. १४ विकेट्स आणि २२६ धावा अशी दुहेरी कामगिरी करत कृणालने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. षटकारांची लयलूट होत असताना कृणालने बाऊन्सरचा प्रयोग केला. या बाऊन्सरने भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत आणलं. फायनलच्या दडपणाच्या लढतीचा अनुभव असलेल्या कृणालने रविवारी झालेल्या लढतीत गुजरातच्या अनुभवी आणि धोकादायक अशा जोस बटलरला सापळा लावून बाद केलं. अवघ्या २३ धावा देत कृणालने गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवान गोलंदाजांना साथ देण्याचं काम कृणालने चोखपणे केलं. बंगळुरूकडे अनुभवी फिरकीपटू असा कृणालच होता. त्याने फिरकीचा गड समर्थपणे सांभाळला. ते करताना फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही योगदान दिलं.

नवा सामना, नवा नायक आणि सुरेख क्षेत्ररक्षण

हंगामाच्या मध्यात सलामीवीर फिल सॉल्ट दुखापतग्रस्त होऊन मायदेशी परतला. सॉल्ट कोहलीच्या बरोबरीने चांगली सलामी देत होता. सॉल्ट दुखापतग्रस्त झाल्यानंतर आरसीबीने जेकब बेथेलला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला नाही. यानंतर आरसीबी संघव्यवस्थापनाने वेंकटेश अय्यरला संधी दिली. त्याने या संधीचं सोनं केलं. हंगामाच्या पूर्वार्धात डगआऊटमध्ये बसावं लागलेल्या वेंकटेशने या नव्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. ७ सामन्यात वेंकटेशने १८६च्या स्ट्राईकरेटने २०९ धावा केल्या. फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत धावांचा पाठलाग करताना वेंकटेशला दुखापत झाली. पण त्यावर मैदानातच उपचार घेत वेंकटेशने खेळत राहण्याचा निर्णय घेतला. १६ चेंडूत ३२ धावांची खेळी करूनच तो तंबूत परतला. पॉवरप्लेमध्येच विजयाचा पाया रचूया हे विराटबरोबर झालेलं बोलणं त्याने अमलात आणलं. लखनौ आणि राजस्थानकडून खेळताना अपयशी ठरलेल्या देवदत्तने यंदाचा हंगाम गाजवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत देवदत्तने १६ सामन्यात ४६४ धावा कुटल्या. उत्तम तंत्रकौशल्य असणाऱ्या देवदत्तने यंदाच्या हंगामात फिटनेस आणि मोठे फटके यावर भर दिला. देवदत्तने देखण्या अशा खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. फिनिशर म्हणून प्रसिद्ध टीम डेव्हिडने यंदाच्या हंगामात काही मोजक्या संस्मरणीय खेळी साकारल्या. आरसीबीच्या संघव्यवस्थापनाने क्षेत्ररक्षणावर प्रचंड भर दिल्याचं प्रत्येक सामन्यात जाणवलं. झेल टिपणं, धावा वाचवणं, रनआऊट करणं यामध्ये आरसीबीचे वाकबगार ठरले. फलंदाज धावांची टांकसाळ उघडत असताना या छोट्या पण अमूल्य अशा गोष्टींनी आरसीबीला तारलं.