भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून धावा जमवण्यासाठी तो कमालीचा झगडताना दिसत आहे. इंग्लंड विरुद्धच्या एजबस्टन कसोटी सामन्यातही त्याच्या खराब कामगिरीचे सत्र सुरूच राहिल्याचे दिसले. विराट कोहली अवघ्या ११ धावा करून बाद झाला आहे.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जबरदस्त कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. मात्र, मागील तीन वर्षे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ ठरला आहे. कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये शतक झळकावून तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.

लिसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहलीने चांगला खेळ केला होता. त्यामुळे तो फॉर्ममध्ये परत आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आजपासून (१ जुलै) सुरू झालेल्या मुख्य कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने पुन्हा चाहत्यांची निराशा केली. वैयक्तिक ११ धावांवर असताना मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. त्यामुळे विराट कोहलीची मोठी खेळी बघण्यासाठी चाहत्यांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा – VIDEO : बुमराहचा लहानगा फॅन बघितला का? बोबड्या शब्दांमध्ये करतोय चिअर

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विराट कोहलीने आतापर्यंत दोन अर्धशतकांच्या मदतीने २२९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या शतकी आणि द्विशतकी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या नावावर या मालिकेत एकाही शतकाची नोंद नाही.