Virat Kohli Fan Viral Video: आरसीबीने रायपूरमध्ये केकेआरविरूद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. यासह आता आरसीबीचा संघ १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात दिग्गज खेळाडू विराट कोहलीने उत्कृष्ट शतकी खेळी साकारली. विराटने या सामन्यात नाबाद १०५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. रायपूरमध्ये आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते उपस्थित होते. यादरम्यान एक चाहता विराटला भेटण्यासाठी मैदानावर धावत आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्या एका चाहत्याने सुरक्षा भेदून विराट कोहलीच्या पायांना स्पर्श करण्यासाठी मैदानात धाव घेतली. सोशल मीडियावर झटपट व्हायरल झालेल्या या घटनेने, कोहलीबद्दल चाहत्यांचं असलेलं वेड पुन्हा एकदा दिसून आलं. लोक म्हणत आहेत की ‘विराट पगलू’ असलेल्या चाहत्याने विराटला भेटत आपलं जणू स्वप्न पूर्ण केलं आहे. आजकाल सोशल मीडियावर चाहत्यांना ‘पगलू’ म्हटलं जातं.
कोहली फलंदाजी करत असताना, एक चाहता साईटस्क्रीनच्या भागातून धावत आला आणि सुरक्षा अधिकारी त्याला थांबवण्यापूर्वीच त्या स्टार फलंदाजापर्यंत पोहोचला. वैभव अरोरा गोलंदाजी करत होता, त्याने हात दाखवत विराटला सावध केलं. तितक्यात विराटने चाहत्याला धावत येताना पाहिलं. त्या चाहत्याने विराटच्या पायापाशी थेट लोटांगण घातलं. विराटदेखील हे पाहून चकित झाला. त्यानंतर चाहत्याने उठत विराटला मिठी मारली. विराटनेही त्याला सावरलं. तोपर्यंत सुरक्षारक्षक मैदानावर पोहोचले होते आणि चाहत्याला बाहेर घेऊन जाताना दिसले.
विराटला भेटण्यासाठी मैदानावर अनेकदा चाहते पोहोचले आहेत. त्या चाहत्याला मैदानाबाहेर नेत नसताना सुरक्षारक्षकांकडून त्याने चाहत्याला वाचवलं आणि नीट मैदानाबाहेर घेऊन जाण्याचा इशारा दिला. विराट कोहली शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाचा हा क्षण आहे.
कोलकाताने २० षटकांत ४ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात आरसीबीने १९.१ षटकांत ४ गडी गमावून १९४ धावा करत सामना जिंकला. आरसीबीच्या अनुभवी खेळाडूने ११ चौकार आणि ३ षटकारांसह अवघ्या ६० चेंडूंमध्ये नाबाद १०५ धावा करत बंगळूरला केकेआरवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. त्याच्या शतकामुळे आरसीबी आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी पोहोचली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
