Virat Kohli Viral Video: आयपीएल २०२६ स्पर्धेत विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराटने आधी दमदार शतक झळकावलं,त्यानंतर अर्धशतक झळकावलं आहे. पंजाब किंग्स संघाविरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात विराटने ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. दरम्यान फलंदाजी करताना विराटचा मजेशीर अंदाज देखील पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे. या सामन्यातही फलंदाजीला येताच त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. यादरम्यान विराटने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ हरप्रीत ब्रारच्या हातात गेला. ज्यावेळी त्याने चेंडू पकडला त्यावेळी विराट क्रिझच्या बाहेर होता. हरप्रीत ब्रारने थ्रो करणं टाळलं. पण विराट क्रिझच्या बाहेर उभा राहिला आणि त्याला चिडवताना दिसून आला. विराट त्याला म्हणाला, ” हिंमत असेल तर मार ना हिट…”, असं म्हणताना दिसून आला. पण हरप्रीत ब्रारने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. विराट याआधी देखील हरप्रीत ब्रारसोबत मस्ती करताना दिसून आला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराटने मोडले मोठे रेकॉर्ड

विराट कोहलीने या डावात ५८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेतील १९ हंगामात सर्वाधिक वेळेस ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने आतापर्यंत ९ वेळेस ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यासह वयाची ३५ वर्ष पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक वेळेस ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत देखील अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने वयाची ३५ वर्ष पूर्ण केल्यानंतर ३ वेळा ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी सचिन तेंडुलकर आणि फाफ डू प्लेसिसने प्रत्येकी २-२ वेळेस ५०० हून अधिक धावा केल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केल्या २२२ धावा

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सलामीला आलेला जेकब बेथेल अवघ्या ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने ५८ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने ४५ धावा केल्या. तर टीम डेव्हिडने २८ धावा केल्या. तर वेंकटेश अय्यर ७३ धावांवर नाबाद राहिला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२२ धावा केल्या.