India vs England ODI series Virat Kohli Gautam Gambhir Edgbaston: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामना आज एजबस्टनमध्ये खेळवला जात आहे. या वनडे मालिकपूर्वी संघाने एजबस्टनमध्ये चांगला सराव केला आहे. सराव सत्राचे अनेक फोटो, व्हीडिओ आपल्याला पाहायला मिळाले. एजबस्टनमध्ये झालेल्या भारतीय संघाच्या सराव सत्रात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेच्या तयारीपेक्षा विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. दोघांनी सराव सत्रादरम्यान एकमेकांशी बिलकुल संवाद साधला नाही.
सरावादरम्यान कोच गौतम गंभीर हे रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशी संवाद साधताना दिसले. मात्र, संपूर्ण सराव सत्रात गंभीर आणि विराट यांच्यात कोणताही थेट संवाद झाल्याचं पाहायला मिळालं नाही. विराटने नेट्समधील फलंदाजी पूर्ण केल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गंभीर आणि विराट या दोघांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचंही पाहायला मिळालं.
मालिकेपूर्वीच्या या सराव सत्रातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि संघातील सर्वात मोठा स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यातील संवादाचा पूर्ण अभाव ठरला.
विराट-गंभीर यांच्यातील समीकरण पुन्हा चर्चेत
एजबस्टनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण सराव सत्रादरम्यान विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात कोणताही प्रत्यक्ष संवाद झाल्याचं दिसलं नाही. विराटने बराच वेळ नेट्समध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी प्रथम विराटशी स्वतंत्र चर्चा केली आणि त्यानंतर गौतम गंभीर यांच्याशी संवाद साधला. या घडामोडींमुळे मालिकेपूर्वी विराट आणि गंभीर यांच्या संबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीकडून खेळताना झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली खेळू शकला नव्हता. या मालिकेला मुकल्यानंतर विराट कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन होत आहे. त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सलग टी-२० मालिकांतील पराभवानंतर भारतीय संघ दमदार पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे.
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवांमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफवर टीकेची झोड उठली आहे. याशिवाय, इंग्लंड दौऱ्यात संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांना हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी तर संघ व्यवस्थापन “गोंधळलेलं” असल्याची टीकाही केली आहे.
