Virat Kohli Special Tips To Net Bowler: विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याची फलंदाजी पाहून विरोधी संघातील खेळाडू देखील मंत्रमुग्ध होतात. विराटने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचे अनेक मोठे रेकॉर्डस मोडून काढले आहेत. मैदानावर उतरण्यापूर्वी तो नेट्समध्ये कसून सराव करतो. जेव्हा युवा खेळाडूंना सल्ला देण्याची वेळ येते तेव्हाही तो नेहमीच पुढे असतो. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो युवा खेळाडूला मोलाचा सल्ला देताना दिसून येत आहे.
विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. २०२४ मध्ये त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो सध्या वनडे क्रिकेट खेळत आहे. सध्या तो न्यूझीलंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्याआधी त्याने कसून सराव केला. दरम्यान नेट्समध्ये सराव करत असताना त्याने नेट बॉलरला ऑटोग्राफ दिला यासह मोलाचा सल्ला देखील दिला.
विराटचा नेट बॉलरला मोलाचा सल्ला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पहिल्या सामन्याआधीचा आहे. विराट सल्ला देताना नेट बॉलरला म्हणाला, “बॉलर जर काहीच प्रयत्न करत नसेल आणि बॉल आपोआप फिरायची वाट पाहत असेल, तर ही माझी चूक आहे का? फलंदाजाने धुलाई केली तरी चालेल. तुला जो बॉल टाकायचं आहे तोच टाक. फलंदाज आपल्याला जसा बॉल टाकायला भाग पाडत आहे, तसा बॉल टाकायचा नाही.”
विराट युवा खेळाडूंना मोलाचा सल्ला देत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. विराट जिथे जिथे खेळण्यासाठी जातो, तिथे तो युवा खेळाडूंना प्रोत्साहित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. याआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही ज्या गोलंदाजाने विराटला आऊट केलं होतं, त्या गोलंदाजाला विराटने ऑटोग्राफ दिला होता. यासह त्याच्यासोबत चर्चा देखील केली होती.
