Virat Kohli Gave Special Gift To Vishal Jaiswal: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेत दिल्लीचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा सामना गुजरात विरुद्ध पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना विराटने ७७ धावांची खेळी केली. विराटकडे या सामन्यातही शतक झळकावण्याची संधी होती. पण गुजरातचा फिरकी गोलंदाज विशाल जैस्वालने विराटला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. दरम्यान सामना झाल्यानंतर विराटने विशाल जैस्वालला खास गिफ्ट दिलं.
विराटने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेश संघाविरुद्ध खेळताना दमदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तो शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज विशाल जैस्वालने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर विराटने स्टेपआऊट होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो यष्टीचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे विराटचा डाव ७७ धावांवर आटोपला.
विराट सारख्या दिग्गज खेळाडूला बाद करणं ही कुठल्याही गोलंदाजासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे विशालचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या आनंदात आणखी भर पडली जेव्हा विराटने मॅच बॉलवर ऑटोग्राफ दिला आणि विशाल सोबत फोटो क्लिक केला. हा फोटो विशालने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यासह त्याने हटके कॅप्शन देखील दिलं आहे.
विशाल जैस्वालने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटला आऊट केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “संपूर्ण जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवणाऱ्या फलंदाजसोबत एकाच मैदानावर खेळणं आणि त्याला आऊट करणं हा असा क्षण आहे, ज्याचा मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. विराट भाईला आऊट करणं हे नेहमीच मला लक्षात राहील.” विशालने विराट कोहलीसोबतचा फोटो आणि ज्या चेंडूने विराटला आऊट केलं, त्यावर असलेल्या विराटच्या ऑटोग्राफचा फोटो देखील शेअर केला आहे.
