Sarfaraz Khan Virat Kohli Moment Viral Video: आयपीएल २०२६ मधील सीएसकेला तिसऱ्या सामन्यात आरसीबीकडून ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला. आरसीबीचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता आणि विजयासह आरसीबी गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत सीएसकेला विजयासाठी २५१ धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्फराझ खानने पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. सर्फराझच्या या खेळीवर विराट कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांची मनं जिंकली आहेत.

प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने २० षटकांत ३ गडी गमावून २५० धावा केल्या, तर सीएसकेला १९.४ षटकांत केवळ २०७ धावाच करता आल्या. या सामन्यात टीम डेव्हिडने २५ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा करून खळबळ उडवून दिली आणि आरसीबीला २५० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. आरसीबीने सामना जिंकला असला तरी, सीएसकेच्या सर्फराझ खानने २५ चेंडूंमध्ये ५० धावा करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. सर्फराझ खानने आठ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. पण कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर तो लगेच बाद झाल्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

विराट कोहलीच्या सर्फराझसाठीच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं

जेव्हा सर्फराझ ही वादळी खेळी केल्यानंतर बाद झाला, तेव्हा निराश होत तो मैदानाबाहेर जात होता. एकीकडे संपूर्ण आरसीबीचा संघ कृणाल पंड्याचं कौतुक करत सर्फराझच्या विकेटचं सेलिब्रेशन करत होता. दुसरीकडे विराट कोहलीच्या कृतीने मात्र सर्वांची मनं जिंकली. विराट कोहलीने इतका आवाज असतानाही मैदानाबाहेर जात असलेल्या सर्फराझला आवाज दिला आणि त्याने वळून पाहताच टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. कोहलीची ही कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने एकदा सर्फराझला एक महान फलंदाज म्हटलं होतं, पण खराब फिटनेसमुळे सर्फराझला फारश्या संधी मिळत नव्हत्या. मात्र, सर्फराझने पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर कठोर मेहनत घेतली आणि दणक्यात पुनरागमन केलं.

विराट कोहली सर्फराझ खानचं कौतुक करतानाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सर्फराझने सामन्यात २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, जे पाहून विराट कोहलीही त्याचं कौतुक करताना थांबला नाही. सर्फराझ खानने आरसीबी संघातूनच आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली होती.

२०१५ मध्ये, जेव्हा सर्फराझ आरसीबी संघाचा भाग होता, तेव्हा तो १७ वर्षांचा होता. २०१५ च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना सर्फराझने २१ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या होत्या. सर्फराझ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, कोहलीने आदराने नतमस्तक होत त्याचं पॅव्हेलियनमध्ये स्वागत केलं होतं. त्यावेळेस कोहलीने सर्फराझला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हटलं होतं, पण नंतर फिटनेसमुळे सर्फराझला त्याच्या प्रतिभेनुसार कमी संधी मिळाल्या, पण या आयपीएलमध्ये सर्फराझ एका वेगळ्याच फॉर्मात दिसत आहे.