Virat Kohli Gesture wins hearts: आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून विराट कोहलीने खास बालपणीच्या कोचसाठी वेळ काढला आणि डीपीएस आरके पुरम येथे पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिला. या कार्यक्रमासाठी विराट कोहली प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी कोहलीने अनेक तरूण क्रिकेटपटूंची भेट घेतली. यादरम्यान स्टेजवर एक खेळाडू विराटच्या पाया पडला, यावर विराटने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.

विराट कोहलीला इतक्या जवळ पाहून तरुण क्रिकेटपटू खूप आनंदित झाले होते. इतकंच नाही तर, किंग कोहलीने आरके पुरम येथील पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीच्या नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी भाषण देऊन तरुण क्रिकेटपटूंना प्रेरित केलं. दरम्यान, या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण क्रिकेटपटू कोहलीकडून सन्मानचिन्ह स्वीकारताना दिसत आहे.

कोहलीकडून सन्मानचिन्ह मिळाल्यानंतर तो क्रिकेटपटू विराटच्या पायांना स्पर्श करतो, हे पाहून कोहली थक्क होतो. जेव्हा त्या तरुण खेळाडूने कोहलीच्या पायांना स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेतला. या कृतीवर प्रतिक्रिया म्हणून, किंग कोहलीने मागे होत तरूण खेळाडूसमोर हात जोडले. विराट जणू हात जोडून त्याला सांगत होता, माझ्या पाया पडू नकोस. चाहत्यांनी विराटच्या या कृतीचं प्रचंड कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या या नम्रपणाचा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली हे देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. विराट कोहलीने राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.

“सर्वप्रथम तुमच्या शाळेच्या वातावरणाचा आदर करा. तुमचे शिक्षक आणि तुम्हाला शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान ठेवा. ते त्यांच्या आयुष्यातील वेळ तुम्हाला देत आहेत, त्यामुळे त्यांना योग्य तो मान आणि त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मी लहानपणापासूनच खेळाची निवड केली, पण ती खूप प्रामाणिकपणे केली. मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे, याची मला पूर्ण खात्री होती. त्यामुळे मी स्वतःशी, कुटुंबाशी आणि शिक्षकांशीही प्रामाणिक राहून हा मार्ग निवडला असं किंग कोहलीने सांगितलं.”

विराट पुढे म्हणाला, “मी आठ वर्षांचा असताना सराव सुरू केला आणि आजही वेळ मिळाला की अकॅडमीमध्ये येतो. माझ्या बालपणाचा हा खूप मोठा भाग आहे. इथे शिकायला येणाऱ्या प्रत्येक मुलाने या गोष्टीची कदर करावी, काहीतरी शिकावं. ही अकॅडमी आणि इथला क्रिकेट सेटअप शाळेसाठीही मोठं यश घेऊन येवो, अशी माझी इच्छा आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा.”