टी-२० विश्वचषकातील सुपर८ च्या फेरीला १९ जूनपासून सुरूवात होणार असून भारताचा पहिला सामना केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ बार्बाडोस येथे सराव करत आहे. या सराव सत्रादरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू वेस्ली हॉल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विराटला एक खास भेटवस्तूही दिली.

वेस्ट इंडिजचे ८६ वर्षीय दिग्गज क्रिकेटपटू वेस्ली हॉल यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. भारताच्या सराव सत्रानंतर विराट कोहली वेस्ली यांची भेट घेत त्यांच्यासह गप्पा रंगवतानाही दिसला. यादरम्यान वेस्ली यांनी कोहलीला आपलं आत्मचरित्रपर पुस्तक ‘आन्सरिंग द कॉल: द एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ ऑफ सर वेस्ली हॉल’ भेट दिलं.

विराट कोहलीसह वेस्ली यांनी भारतीय खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही भेट घेतली. विराटच्या भेटीनंतर वेस्ली यांनी त्याचे कौतुक करत म्हटले की, ”तू इथे सरावासाठी आला आहेस आणि तुला एका वरिष्ठ व्यक्तीला इथे भेटावं लागलं. मी अनेक मोठे खेळाडू पाहिले आहेत आणि त्यापैकी तू एक आहेस. मी तुझी कारकिर्दीही पाहिली आहे. आणि मला आशा आहे की तू आणखी अनेक वर्षे भारतासाठी खेळशील.” क्रिकेटविषयी बोलताना वेस्ली यांनी पुढे सांगितले की आता हा खेळ खूप बदलला असून फलंदाजीला अनुकूल असं क्रिकेट झालं आहे.

१९६० सालच्या वेस्ट इंडिज संघातील एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून वेस्ली हॉल यांना ओळखलं जातं. वेस्ली हॉल यांनी आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले. हॉल यांनी १९५८ मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्यातून वेस्ट इंडिजसाठी पदार्पण केले. वेस्ली यांनी ४८ कसोटी सामन्यांमध्ये १९२ विकेट्स घेतल्या आहेत. तर मार्च १९६९ मध्ये ऑकलंड येथे खेळवल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर वेस्ली हॉल यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

टी-२० विश्वचषकातील सुपर८ फेरीसाठी दोन गटांतील टॉप २ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या फेरीतील प्रत्येक सामना सर्वच संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. पुढील सामन्यांमध्ये विराट कोहली पुन्हा आपला फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करताना दिसेल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यासोबत सुपर-८ च्या पहिल्या गटात आहे.