आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतले.

त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या होत्या. नेमकं तेव्हाच रजत पाटीदारने अर्शद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रजत पाटीदारला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. या झेलवरून चांगलाच वाद पेटला. विराट कोहली चौथ्या पंचासोबत वाद घालताना दिसून आला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरू ८ वे षटक टाकण्यासाठी अर्शद खान गोलंदाजीला आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७ षटकात ७१ धावा केल्या होत्या. ८ व्या षटकातील सुरुवातीच्या ३ चेंडूत त्याने ८ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू उंच हवेत गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेसन होल्डरने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. पण ज्यावेळी त्याने झेल घेण्यासाठी डाईव्ह मारली त्यावेळी, चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाल्याचं दिसून आलं.

हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रिप्लेमध्ये पाहिलं गेलं, तरीदेखील त्याला बाद घोषित करण्यात आलं. बादचा निर्णय येताच डगआऊटमध्ये असलेला विराट कोहली संताप व्यक्त करताना दिसून आला. तो आपल्या बाजूलाच उभे असलेल्या चौथ्या पंचांसोबत चर्चा करताना दिसून आला. तो या निर्णयावरून नाराज असल्याचं दिसून येत होतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे रजत पाटीदारला १५ चेंडूत १९ धावांची खेळी करून माघारी परतावं लागलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला.