Virat Kohli To Play in England?: विराट कोहलीने हल्लीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराटने १२ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. विराटने त्याचा सर्वात आवडता क्रिकेट फॉरमॅट कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं यश मिळवलं होतं. पण यादरम्यान विराटला इंग्लंडमधील एका संघाकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर देण्यात आली आहे.

विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेण्यापूर्वी ५ दिवस आधी कर्णधार रोहित शर्मानेही कसोटीला अलविदा केलं. जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ दोन अनुभवी आणि सिनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय दिसणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा दौरा मोठं आव्हान असणार आहे.

विराट कोहलीच्या निवृत्तीदरम्यान त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मिडलसेक्स या काऊंटी संघाला विराट कोहलीने त्यांचे प्रतिनिधित्व करावे असे वाटते. द गार्डियनने वृत्त दिले आहे की कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही. त्यात असंही म्हटले आहे की कोहली “काऊंटी चॅम्पियनशिप किंवा वन-डे कप” खेळू शकतो.

मिडलसेक्सचे क्रिकेट संचालक अॅलन कोलमन म्हणाले, “विराट कोहली हा त्याच्या पिढीतील सर्वात प्रतिष्ठित खेळाडू आहे. त्यामुळे अर्थातच आम्हाला तो आमच्या संघाकडून खेळेल का याबद्दल चर्चा करण्यात रस आहे.”

मिडलसेक्सने भूतकाळात मोठ्या खेळाडूंना आकर्षित केले आहे, कारण त्यांचे घरचे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदान आहे. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स टी२० ब्लास्टमध्ये खेळला होता. लंडन स्पिरिटने द हंड्रेडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला संघात सामील केले आहे.

डिव्हिलियर्स आणि विल्यमसनबरोबरचे दोन्ही करार एमसीसी (मेरीलेबोन क्रिकेट क्लब) च्या सहकार्याने करण्यात आले. याचा अर्थ त्यांना स्टार खेळाडूंना करारबद्ध करण्याचा अनुभव आहे. आता अधिकाऱ्यांनी असेही संकेत दिले आहेत की ते विराट कोहलीसाठीही असाच करार करू इच्छितात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिडलसेक्स संघाला आशा आहे की कोहलीला ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्समध्ये पुन्हा खेळण्याचा आनंद मिळेल आणि त्याला सहभागी करून घेण्यात ते उत्सुक आहेत. जर विराट कोहली खरोखरच इंग्लंडमध्ये रेड-बॉल क्रिकेट खेळत असेल, तर हंगामाच्या अखेरीस तो लँकेशायरच्या जेम्स अँडरसनविरुद्ध खेळताना दिसण्याची शक्यता आहे.