आयपीएल २०२६ ला दणक्यात सुरूवात झाली आहे. गतविजेत्या आरसीबीने विजयाने मोहिमेचं रणशिंग फुंकलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. नाबाद ६९ धावा करणारा विराट कोहली बंगळूरच्या विजयाचा हिरो ठरला. डावाची सुरुवात करत तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. दरम्यान, विराट कोहलीने आरसीबीचा विजय एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. सामन्यानंतर त्याने मैदानावरून आपली पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस पाठवला. अनुष्काने त्याला फ्लाईंग किस दिली खरी पण यानंतर तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा हा फ्लाईंग किसचा हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आरसीबीने सामना जिंकल्यानंतर कोहलीने आधी पंच आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि नंतर डगआऊटच्या दिशेने जाताना त्याने स्टँड्सकडे पाहून अनुष्काला सर्वात आधी बॅट दाखवला आणि मग फ्लाइंग किस दिली; हा क्षण कॅमेऱ्यात लगेच कैद झाला. संपूर्ण सामन्यादरम्यान संघाला पाठिंबा देणाऱ्या अनुष्का शर्माने, छानशी स्माईल देत फ्लाइंग किसने विराटला प्रतिसाद दिला. यानंतर अनुष्काने डाव्या हात दाखवत ‘हा पण ना’ अशी प्रतिक्रिया दिली.

विराटला फ्लाईंग किस दिल्यानंतर अनुष्का शेजारी असलेल्या मैत्रिणीशी बोलताना दिसली की, ‘मी याला सांगितलं आहे, मैदानावरून फ्लाईंग किस देत जाऊ नकोस.’ विराट आणि अनुष्काचा हा गोड क्षण चाहत्यांना खूप आवडत आहे. तर अनुष्काच्या सहज प्रतिक्रियेनेदेखील सर्वांचं लक्ष वेधलं.

विराट कोहली बऱ्याच काळानंतर मैदानावर परतला आहे. २०२५ मधील वनडे मालिकेनंतर विराट पहिल्यांदा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला. विराटने या सामन्यात ३८ चेंडूंत प५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. आपल्या संघाला विजय मिळवून देत किंग कोहली नाबाद परतला. त्याला दुसऱ्या टोकाकडून देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी चांगली साथ दिली. पडिक्कलने २६ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. त्याच्या शानदार खेळीमुळे, आरसीबीने २०२ धावांचं लक्ष्य केवळ १५.४ षटकांत पूर्ण केलं.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून इशान किशनने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. त्याने ३८ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांसह ८० धावा केल्या. हेनरिक क्लासेननेही २२ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या, तर अनिकेत वर्माने १८ चेंडूंमध्ये ४३ धावांची वेगवान खेळी केली. या खेळींमुळे सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत २०१ धावा करता आल्या. तर आरसीबीचा पदार्पणवीर जेकब डफीने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आणि हैदराबादच्या वरच्या फळीला माघारी धाडलं आणि सामनावीर ठरला.