स्वत:चा खेळ समजून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विराट कोहली नेहमीच तयार असतो. त्यामुळे तो सध्याच्या काळातला ‘ग्रेट प्लेयर’ आहे असे मत भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. क्रिकेट इंडिया अकादमीसाठी प्रतिभावंत क्रिकेटपटूंचा शोध घेण्यासाठी कर्स्टन सध्या राजधानी दिल्लीमध्ये आले आहेत. भारताचा आगामी इंग्लंड दौरा उत्कंठावर्धक असेल असे मत कर्स्टन यांनी व्यक्त केले.

कोहली महान क्रिकेटपटू आहे. स्वत:च्या खेळामध्ये सुधारणा करण्यावर नेहमीच त्याचा भर असतो. कोहलीमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा आहे. त्याला त्याच्या खेळाबद्दल अधिक समजून घ्यायचे असते त्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्यात मजा येते असे कर्स्टन म्हणाले. दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर राहिलेल्या कर्स्टन यांनी भारताचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे.

भारताचा वर्ल्डकप विजेता संघ घडवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. टी२० चा क्रिकेटच्या अन्य पारंपारिक प्रकारांवर काय परिणाम होतो त्या प्रश्नावर ते म्हणाले कि, टी २० क्रिकेटकडे जास्तीत जास्त युवा क्रिकेटपटू आकर्षित होत आहेत. मी सुद्धा टी२० क्रिकेटचा आनंद घेतो. आजच्या युवा पिढीला हे क्रिकेट भावले आहे. यात एक मनोरंज असून माझ्या मुलांना क्रिकेटच्या अन्य प्रकारांपेक्षा टी२० क्रिकेट पाहायला जास्त आवडते असे कर्स्टन म्हणाले.