भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने आणि शुबमन गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि भारतीय संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. २००३ नंतर ईडन पार्कच्या मैदानावर मिळवलेला भारतीय संघाचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा एकतर्फी विजय
या सामन्यात भारतीय संघाला सुरूवातीला विजयासाठी १८६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. कारण रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलच्या जोडीने मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या डावात पावसामुळे २ वेळा सामना थांबवण्यात आला. शेवटी डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाला विजयासाठी ३२ षटकांत १४३ धावांची गरज होती.यादरम्यान विराट कोहली आणि शुबमन गिलने मिळून दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांचे योगदान दिले. यादरम्यान शुबमन गिलने ३७ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ७४ धावांचे योगदान दिले आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीला आलेला टीम सेफर्ट ३८ धावांवर माघारी परतला. तर विल यंग अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिचेलने २८ आणि शेवटी ग्लेन फिलिप्सने ३० तर टिकनरने ३४ धावांचे योगदान दिले. पण न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी
या विजयात भारतीय गोलंदाजांनी मोलाचं योगदान दिलं. कारण कर्णधार गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगने १० षटकांत ७० धावा खर्च करून सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर गुरनूर ब्रारने ९.२ षटकांत ४४ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. यासह अंशूल कंबोजने १० षटकांत अवघ्या २२ धावा खर्च करून २ गडी बाद केले.
