ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर बंगळुरू कसोटीत भारतीय संघासमोर पुनरागमनाचे आव्हान असणार आहे. मायदेशात पराभव टाळण्यासाठी आणि मालिका टिकवण्यासाठी भारतीय संघाला बंगळुरू कसोटी जिंकणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र, पहिल्या कसोटीतील भारतीय संघाची कामगिरी पाहता संघासमोर चांगल्या कामगिरीचा दबाव आणि आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाला विराट कोहली मोठ्या हिमतीने सामोरा जाईल आणि यशस्वी देखील होईल, असा विश्वास कोहलीच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केला. कोहलीला आव्हानांवर मात करणं खूप आवडतं, हेच त्याचं प्रेम आहे आणि अशावेळीच त्याच्याकडून चांगली कामगिरी होते. त्यामुळे बंगळुरू कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करेल असा विश्वास आहे, असे राजकुमार शर्मा म्हणाले.

 

पुण्यातील पराभवानंतर माझं विराटशी बोलणं झालेलं नाही. आयुष्यात चढ-उतार येत राहतात तुम्ही त्यावर कशा पद्धतीने मात करता हे महत्त्वाचे असते. एखाद्या अपयशामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कोहली लढवय्या आहे आणि त्याला आव्हानांना सामोरे जायला आवडते. दुसरी कसोटी नक्कीच महत्त्वाची आहे आणि मला विश्वास आहे. केवळ कोहलीच नाही, तर संपूर्ण संघ यावेळी झोकात पुनरागमन करेल, असेही राजकुमार पुढे म्हणाले.

दबावाच्या परिस्थितीत आणि आव्हानांना सामोरे जातानाची कोहलीची चिकाटी वृत्ती तो वयाच्या दहाव्या वर्षात असतानाच आपण पाहिली असल्याचेही राजकुमार यांनी सांगितले. विराटमध्ये वयाच्या दहाव्या वर्षातच एका प्रगल्भ खेळाडूची वृत्ती दिसून आली होती. अर्थात त्याने आजवर घेतलेले परिश्रम आणि अखंड सरावाच्या जोरावर तो सर्वोत्कृष्ट होऊ शकला. एक प्रशिक्षक म्हणून मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. दिवसागणिक कोहली नवनवे विक्रम रचतो, हे पाहून मन भरून येते, अशा भावना राजकुमार यांनी व्यक्त केल्या.