अपयशावर मात करण्याची कोहलीकडे क्षमता -जयवर्धने

भारतीय संघाच्या अलीकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही कोहली सहा डावांत केवळ ७६ धावाच करू शकला होता.

अपयशावर मात करण्याची कोहलीकडे क्षमता -जयवर्धने
(संग्रहित छायाचित्र)

दुबई : भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली अपयशाच्या गर्तेतून जात असला, तरी यावर मात करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो लवकरच यातून बाहेर पडेल, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने व्यक्त केले आहे.

ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोहली आणि लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कोहली कारकीर्दीत प्रथमच कठीण कालखंडातून जात आहे. कोहलीने नोव्हेंबर २०१९ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही शतक झळकावलेले नाही. भारतीय संघाच्या अलीकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही कोहली सहा डावांत केवळ ७६ धावाच करू शकला होता. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आणि आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले.

‘‘कोहलीच्या बाबतीत सध्या जे काही होत आहे, ते दुर्दैवी आहे. पण तो गुणी खेळाडू आहे. कोहलीच्या खेळात दर्जा आहे आणि तो कायम टिकून असतो, अपयश तेवढय़ापुरतेच असते. यासाठी त्याला जास्तीत जास्त सामने खेळायला मिळण्याची आणि त्याने खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहण्याची गरज आहे,’’ असे जयवर्धने म्हणाला.

भारताने सलामीसाठी डावखुऱ्या फलंदाजांचा विचार करण्याची गरज असून यासाठी ऋषभ पंत हा उत्तम पर्याय असेल, असेही जयवर्धनेने स्पष्ट केले. ‘‘कुठल्याही क्रमांकावर पंत खेळायला आला तरी त्याचा खेळ बदलत नाही. ही त्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे म्हणूनच भारताने त्याला सलामीला खेळवण्याचा विचार करावा,’’ असे जयवर्धनेने सांगितले.

‘‘इंडियन प्रीमियर लीगनंतर राहुल फार क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे तो कितपत प्रभावी ठरू शकेल,’’ अशी शंकाही जयवर्धनेने उपस्थित केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli has the ability to overcome failure says jayawardene zws

Next Story
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला एक दिवस आधी प्रारंभ?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी