Virat Kohli Instagram Account: भारतीय संघ सध्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीत व्यस्त आहे. तर टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली टी-२०मधून निवृत्ती घेतल्यामुळे आपआपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवत आहेत. दोघेही सोशल मीडियावर मात्र चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यादरम्यान विराट कोहलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्याचं समोर आलं आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

शुक्रवारी सकाळी, जेव्हा चाहत्यांना अचानक लक्षात आलं की विराट कोहलीचं अकाउंट इन्स्टाग्राम सर्चमध्ये दिसत नाहीये, तेव्हा सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. यानंतर चाहत्यांनी अनुष्का शर्माकडून याबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पण काही तासांनंतर विराट कोहलीचं अकाऊंट पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट झालं.

जवळजवळ २७४ मिलियन फॉलोअर्स असलेल्या विराट कोहलीचं अकाऊंट इन्स्टाग्रामवरून अचानक गायब होणं हे आश्चर्यकारक होतं. विराट कोहलीचं अकाऊंट आता इन्स्टाग्रामवर पुन्हा दिसत असलं तरी चाहत्यांमध्ये अजूनही हाच प्रश्न आहे: कोहलीचं अकाउंट असं डिअ‍ॅक्टिव्हेट कसं झालं? यामागील कारण जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. विराट कोहली सध्याच्या घडीला उत्तम फॉर्मात आहे. तो गेल्या काही काळात पुन्हा फोटो देखील पोस्ट करू लागला आहे. त्यामुळे अचानक असं काय घडलं की, त्याचं अकाऊंट दिसायचं बंद झालं.

अलीकडेच, अनुष्का आणि विराटने त्यांच्या लंडनमधील घरी पूजा केली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. प्रोफाइल गायब करणं हे जाणूनबुजून होतं का, याबद्दल विराट कोहली, त्याच्या टीम किंवा इन्स्टाग्रामकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीचे इन्स्टाग्राम अकाउंट देखील सर्चमध्ये दिसत नव्हतं त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं होतं. त्याचा प्रोफाइल ओपन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युझर्सना ‘प्रोफाइल उपलब्ध नाही’ असाच संदेश मिळत आहे.

Virat Kohli Instagram Account
विराट कोहली इन्स्टाग्राम अकाऊंट

रोहित शर्मा करणार मोठी घोषणा

एकीकडे विराट कोहलीने इन्स्टाग्रामवरून गायब होऊन चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत, तर दुसरीकडे रोहित शर्मा आज (शुक्रवारी) इन्स्टाग्रामवर एक मोठी घोषणा करणार आहे. रोहित शर्माने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामुळे खूप सस्पेन्स निर्माण झाला. त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चाहते खूपच उत्साहित आहेत. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं होतं की तो आज त्याच्या नवीन भूमिकेची घोषणा करेल. रोहित नेमकी काय घोषणा करणार यावर सर्वांच्या नजरा असतील.