Virat Kohli Post on Dhurandhar 2 Movie: आयपीएल २०२६ दरम्यान विराट कोहलीदेखील धुरंधर-२ चित्रपट पाहून थक्क झाला आहे. विराटने धुरंधर-२ चित्रपट पाहिल्यानंतर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. विराट कोहलीने माजी क्रिकेटपटू व दिग्दर्शक आदित्य धरचं विशेष कौतुक केलं आहे. विराट कोहलीबरोबर अनुष्का शर्मानेदेखील धुरंधर-२ चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे.
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकताच आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ हा चित्रपट पाहिला असून, सोशल मीडियावर या पॉवर कपलची प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे. विराटने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केली. हा चित्रपट केवळ त्याच्या कथेसाठीच नाही, तर त्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेकिंगसाठी ओळखला जात आहे. तब्बल ४ तासांचा हा चित्रपट असूनही प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. अभिनेता रणवीर सिंह याने या चित्रपटात आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक आणि प्रभावशाली अभिनय केला असून, त्याच्या शारीरिक परिवर्तनाची (Physical Transformation) सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने १२०० कोटींचा टप्पादेखील पार केला आहे.
विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटासंबंधित एक फोटो शेअर केला. ‘धुरंधर’च्या फोटोसोबत त्याने लिहिलं, “मी नुकताच ‘धुरंधर २’ पाहिला आणि मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, असा चित्रपट मी आजवर भारतात कधीही पाहिला नाही. काय अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आहे! या चित्रपटाने सर्व भावनांची जणू एक लाटच आणली. तब्बल ४ तासांत मी क्षणभरही पडद्यावरून नजर हटवू शकलो नाही. रणवीर, या चित्रपटानंतर तू अभिनयाचा एक वेगळाच स्तर गाठला आहेस. तुझा अभिनय खरोखरच लाजवाब होता. एकदम ‘वॉव’!” विराट कोहलीचा रिव्ह्यू सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

विराट कोहलीबरोबरच पत्नी अनुष्का शर्माने देखील हा चित्रपट पाहिल्यानंतर खास प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काने लिहिलं, “आदित्य धर, काय अप्रतिम चित्रपट साकारला आहेस! तब्बल ४ तासांचा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज असते. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि कथेत पूर्णपणे गुंतवून टाकतो. अत्यंत बारकाईने आणि विचारपूर्वक केलेली ही मांडणी थक्क करणारी आहे. आदित्य, तू एक अत्यंत कल्पक आणि प्रतिभावान दिग्दर्शक आहेस. रणवीर सिंह, तुला आयुष्यात एकदाच मिळणारी अशी ही अजरामर व्यक्तिरेखा तू अक्षरशः जगला आहेस. तुझा या चित्रपटातील अभिनय अत्यंत सकस, प्रगल्भ आणि निर्दोष आहे.” याशिवाय अनुष्काने चित्रपटातील इतर कलाकारांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं आहे आणि म्हटलं की त्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता.

