पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने भारतीय कर्णधार विराट कोहलीला अपयशी कर्णधार म्हटले आहे. यासाठी त्यांनी अनेक कारणे दिली आहेत. कनेरियाने यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल) आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेचे उदाहरण दिले.

विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्याच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने हरला असून स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची निवड ज्या पद्धतीने झाली, त्यावरून विराटवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या कर्णधारपदावर बरीच टीकाही झाली.

कनेरियानेही भारतीय संघाच्या खराब कामगिरीसाठी कोहलीच्या कर्णधारपदाला जबाबदार धरले. त्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले, “याची अनेक कारणे आहेत. विराट कोहली हा एक अपयशी कर्णधार आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चुकीचा संघ निवडला. तो ऑस्ट्रेलियात असताना संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर अजिंक्य रहाणे कर्णधार झाला आणि त्याने संघाला मालिका विजय मिळवून दिला. विराट कोहली हा खूप मोठा खेळाडू आहे, यात शंका नाही पण मला त्याच्यात कर्णधारपदाची क्षमता कधीच दिसली नाही. त्याच्यात खूप आक्रमकता आहे, पण एखाद्या कर्णधारात निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी ती त्याच्यात नाही.”

हेही वाचा – ऐकलं का..? विराटनंतर रोहित नव्हे, तर ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कप्तान!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत अनेकदा पराभूत झाला आहे. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २०१९ वर्ल्डकप सेमीफायनल आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून विराट कोहलीने आतापर्यंत कोणतेही आयसीसी विजेतेपद जिंकलेले नाही.