आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गोलंदाजीच्या शैलीबद्दल सध्या जे नियम केले आहेत, त्या नियमांचा विचार केल्यास श्रीलंकेचा विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला कधीच खेळता आले नसते, असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महम्मद युसूफने व्यक्त केले आहे.
‘‘गोलंदाजी करताना हाताचे कोपर किती अंशाच्या कोनात असावे याबाबत आयसीसीने जो नियम केला आहे, त्यापेक्षा मुरलीची शैली अवैध आहे. आयसीसीने सध्याच्या नियमांचा उपयोग त्या वेळी केला असता तर मुरलीची कारकीर्दच घडली नसती, असे युसूफने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘मी अनेक वर्षे मुरलीची गोलंदाजी खेळलो आहे. गोलंदाजी करण्याबाबत तू नशीबवान आहे, असे मी त्याला दोनतीन वेळा सांगितलेही होते.’’
नवीन नियमावलीचे समर्थन करताना युसूफ म्हणाला, ‘‘आयसीसीने गोलंदाजीच्या शैलीबाबत संशयित गोलंदाजांची चाचणी घेण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा उपयोग केला पाहिजे.’’