भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या आपल्या आजी-माजी सहकाऱ्यांना मागे टाकत, 2018 सालातील सर्वात श्रीमंत खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. किंबहुना 2017 सालातील आपल्या वार्षिक उत्पनापेक्षा यंदाच्या उत्पन्नात विराटने दुपटीने वाढ केली आहे. फोर्ब्स इंडिया मासिकाने यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे.

विराटने 2018 सालात 228.09 कोटी इतकी कमाई केली आहे. जाहीर झालेल्या यादीत विराटने दुसरं स्थान पटकावलं असून खेळाडूंच्या गटात तो पहिला आहे. 2017 साली विराटने 100.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने यंदाच्या वर्षातही या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. 2018 सालातलं सलमानचं उत्पन्न हे 235.25 कोटी इतकं आहे.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीत महेंद्रसिंह धोनी 101.77 कोटींच्या मिळकतीसह पाचव्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने 80 कोटींच्या उत्पन्नासह नववं स्थान मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खेळाडूंच्या गटामध्ये पहिल्या सात जणांमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनेही आपलं स्थान पक्क केलंय. 36.5 कोटींच्या मिळकतीसह ती या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

फोर्ब्ज इंडियाने 2018 सालातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे –

  • विराट कोहली – 228.09 कोटी
  • महेंद्रसिंह धोनी – 101.77 कोटी
  • सचिन तेंडुलकर – 80 कोटी
  • पी.व्ही.सिंधू – 36.5 कोटी
  • रोहित शर्मा – 31.49 कोटी
  • हार्दिक पांड्या – 28.46 कोटी
  • रविचंद्रन आश्विन – 18.9 कोटी