Virat Kohli Jersey in Pakistan Match: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या खराब कामगिरीमुळे चर्चेचा विषय होता. सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वनडे कप खेळवला जात आहे. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पाकिस्तानच्या या देशांतर्गत स्पर्धेत माजी कर्णधार बाबर आझमसह अनेक वरिष्ठ खेळाडू खेळत आहेत. फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा क्रेझ पाहायला मिळाली.

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण

पाकिस्तानमधील देशांतर्गत सामन्यात झळकली किंग कोहलीची जर्सी

पाकिस्तानमध्ये विराटची क्रेझ इतकी वाढली आहे की, आपल्या देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये एक चाहता किंग कोहलीची जर्सी घेऊन स्टेडियममध्ये पोहोचला. या चाहत्याचा फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या जर्सीच्या मागच्या बाजूला विराटचे नाव आणि जर्सी नंबर लिहिलेला दिसत आहे. स्टॅलियन्स आणि मार्कोस (Stallions vs Markhos) यांच्यातील स्पर्धेच्या चौथ्या सामन्यादरम्यान, चाहता कोहलीची जर्सी दाखवत होता आणि तितक्यात कॅमेरामनने ती जर्सी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. या सामन्यात मारखोर्स संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान होता तर स्टॅलियन्स संघात बाबर आझम, शान मसूद असे खेळाडू होते. मार्कोर्सने हा सामना १२६ धावांनी जिंकला.

हेही वाचा – Ravichandran Ashwin: “गेल्या ३-४ वर्षांपासून मी खूप…”, बांगलादेशविरूद्धच्या कसोटीपूर्वी रवीचंद्रन अश्विनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे खूप चाहते आहेत. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अद्याप एकही कसोटी सामना खेळला नसला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.१५ च्या सरासरीने ६७८ धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक धावसंख्या १८३ धावा आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत कोहलीला आपल्या घऱच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी पाकिस्तानी चाहतेही उत्सुक झाले आहेत. मात्र, टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. असे झाल्यास भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर खेळवले जातील.

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय, पाहा VIDEO

सध्या विराट कोहली १९ सप्टेंबरपासून चेन्नईत सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत स्वीप केल्यानंतर बांगलादेशचा संघ आता भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.