भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याला कसोटीच्या शेवटच्या १५ डावांपासून शतकी टप्पा गाठता आलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. यासह त्याने महेंद्रसिंह धोनी, कपिल देव आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. कोहलीने त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम केला आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात १८३ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपले ५ फलंदाज गमावले आहेत.

विराट कोहली भारतीय कर्णधार म्हणून कसोटीत नवव्यांदा शून्यावर बाद झाला. यात त्याने धोनीला मागे टाकले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आठवेळा शून्यावर बाद झाला. कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. कसोटीत तिसऱ्यांदा तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. या विक्रमातही तो पहिल्या स्थानी आहे. यापूर्वी मोहिंदर अमरनाथ, कपिल देव आणि सौरव गांगुली कर्णधार म्हणून कसोटीत दोनदा पहिल्या चेंडूवर बाद झाले आहेत.

 

हेही वाचा – वर्ल्डकपविजेत्या खेळाडूला वर्षभर खेळता येणार नाही क्रिकेट; आयपीएल, वर्ल्डकप, अ‍ॅशेसला मुकणार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग अव्वल

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग अव्वल आहे. तो कर्णधार म्हणून १३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ १० वेळा शून्यावर बाद झाला. जगातील दुसरा कोणताही कर्णधार दहापर्यंत पोहोचलेला नाही. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग कसोटीत ७ वेळा शून्यावर बाद झाला होता.

अँडरसनन, कोहली आणि कसोटी क्रिकेट

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने विराट कोहलीला बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनने सहाव्यांदा कोहलीला बाद केले. यादरम्यान कोहलीने अँडरसच्या ५६६ चेंडूत २३६ धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये अँडरसनने कोहलीला तीन वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.