१४ जानेवारी रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने गमावली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर आपली निर्णय जाहीर केला आहे. पण विराटने कर्णधारपद सोडणार आहे असे सांगितलेली पहिली व्यक्ती कोण होती आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिली हे देखील उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांच्या वृत्तानुसार, कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी विराट कोहलीने सर्वप्रथम भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली होती. शुक्रवारी रात्रीच विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या निर्णयाची माहिती दिली. राहुल द्रविडला आपला निर्णय सांगितल्यानंतर विराटने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत माहिती दिली होती आणि त्याचवेळी त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता.

विराट कोहलीने १५ जानेवारी २०२२ रोजी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी १५ जानेवारीच्या दिवशी विराट कोहलीने भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता आणि आता याच दिवशी त्याने भारतीय संघाचे कर्णधार पद सोडले आहे. गेले चार महिने विराट कोहलीसाठी फारसा चांगला काळ गेला नाही. यादरम्यान त्याने चार संघांचे कर्णधारपद गमावले. विराट कोहलीने १६ सप्टेंबर २०२१ रोजी विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर २० सप्टेंबर २०२१ रोजी विराटने इंडियन प्रीमियर लीग २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आठ डिसेंबर २०२१ रोजी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आणि संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. आता १४ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने १५ जानेवारी २०२२ रोजी ट्विटरवर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीसाठी १५ जानेवारी ही तारीख भूतकाळातही संस्मरणीय राहिली आहे.

कोहलीने १५ जानेवारी २०१७ रोजी पुण्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli leaving test captaincy first informed rahul dravid then called up jay shah abn
First published on: 16-01-2022 at 09:55 IST