श्रीलंकाविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याची गरज असल्याचे मत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.यात विराट कोहलीच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर तिसरा कसोटी सामना आणि मर्यादित षटकांच्या आगामी सामन्यात विराटला विश्रांती देण्याची आवशक्यता आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ईएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

यंदाच्या वर्षी कोहलीने अन्य कोणत्याही क्रिकेटर्सपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला विराटला विश्रांती देण्याची गरज आहे. सातत्यपूर्ण मैदानात उतरणाऱ्या कोहलीने विश्रांतीसाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला होता, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. या वृत्ताला अधिकाऱ्याने फेटाळून लावले. कोहलीने विश्रांती मिळावी, अशी कोणतीही विनंती केलेली नाही. मात्र त्याने अधिक सामने खेळले असल्यामुळे त्याला विश्रांती देण्याची गरज आहे, असे या अधिकाऱ्याने म्हटले.

भारतीय संघाला लागू करण्यात आलेली रोटेशनल पॉलिसी विराटसाठी देखील आहे. श्रीलंका भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यापार्श्वभूमीवर या दौऱ्यापूर्वी विराटला विश्रांती देणे योग्य ठरेल, असे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत देखील विजयी घौडदौड कायम ठेवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कोणतीही कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेची २४ डिसेंबरला टी-२० सामन्याने सांगता होईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.

सध्या न्यूझीलंड आणि भारत यांच्यात मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर १६ नोव्हेंबरला श्रीलका आणि भारत यांच्यातील मालिकेला कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहेत.