भारत @ World Cup T20: मानहानीनंतरचे महानाट्य!

भारताच्या सुमार कामगिरीला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाला रविवारी सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्यामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

सर्वोत्तम संघनिवडीचा दावा करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्ही लढतींमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा खेळ केला. २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताला धूळ चारली. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध भारताला विजय अत्यावश्यक होता. मात्र तसे न झाल्याने भारतीय संघावर चोहीकडून टीकेचा भडीमार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या सुमार कामगिरीला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

…तर भारत उपांत्य फेरीत

* दुसऱ्या गटातून पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असून पाचव्या स्थानावरील भारताची निव्वळ धावगती फारच खालावलेली आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया या संघांविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे.

* न्यूझीलंडने उर्वरित तीनपैकी किमान एक लढत मोठ्या फरकाने गमवावी. तसे झाल्यास भारत-न्यूझीलंड यांचे समान गुण होतील. अशा स्थितीत न्यूझीलंड-अफगाणिस्तान लढत गटातील सर्व समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.

* अफगाणिस्तानने उर्वरित दोनपैकी किमान एक सामना गमवावा. जेणेकरून त्यांचेही पाच सामन्यांत सहा गुण होतील. मग सरस धावगतीच्या बळावर गटातील दुसऱ्या संघाचा फैसला होईल.

कोहलीचे नेतृत्वकौशल्य

द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने देदीप्यमान यश मिळवले. परंतु ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये संघाला जेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने गोलंदाजीत केलेले बदल आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अनाकलनीय होती. नाणेफेकीचा कौलही कोहलीची साथ देत नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

दुखापतींचे चक्रव्यूह

२०१९पासून हार्दिक पंड्याच्या पाठीच्या दुखापतीची मालिका सुरू झाली. त्यानंतर ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामात त्याने एकदाही गोलंदाजी केली नाही. विश्वचषकातील दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ८ चेंडूंत ११ आणि २४ चेंडूंत २३ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध किमान दोन षटके गोलंदाजी करून त्याने दिलासा दिला. मात्र त्याच्या तंदुरुस्तीविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे.

चुकलेली संघनिवड

‘आयपीएल’मधील कामगिरीचा आणि खेळाडूंच्या पूर्ण तंदुरुस्तीचा आढावा न घेता राष्ट्रीय निवड समितीने संघ जाहीर केला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलासुद्धा सातत्याने दुखापतींनी भेडसावले असून त्याची कामगिरीसुद्धा निराशाजनक आहे. ट्वेन्टी-२०मधील भारताचा सर्वोत्तम लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलऐवजी राहुल चहरला दिलेले प्राधान्य आणि ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये हमखास चमकणारा सलामीवीर शिखर धवनऐवजी युवा इशान किशनवर दर्शवलेला विश्वास, असे काही मुद्देसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत.

जैव-सुरक्षिततेचे आव्हान

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून भारतीय खेळाडू करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आखण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच भारताचे प्रमुख खेळाडू ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमिरातीत दाखल झाले. १५ ऑक्टोबरला ‘आयपीएल’ संपल्यानंतर तीन दिवसांतच आपले खेळाडू सराव सामन्यासाठी मैदानात उतरले. विश्वचषकासाठी शारीरिक, मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी खेळाडूंना पुरेसा वेळच मिळाला नाही.

माजी क्रिकेटपटूंची मतमतांतरे

भारतीय खेळाडूंना अपयशाची भीती होती का, हे ठाऊक नाही. मात्र, फलंदाजीच्या क्रमात जो बदल करण्यात आला, तो फायदेशीर ठरला नाही. रोहित शर्मासारख्या उत्कृष्ट फलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून इशान किशनवर सलामीवीराची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. किशनच्या कामगिरी सातत्य नसल्याने त्याला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे योग्य ठरले असते. कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर उत्तम कामगिरी केलेली असताना तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे चुकीचे ठरले. – सुनील गावस्कर

आम्ही तिन्ही आघाड्यांवर निराशाजनक खेळ केला, ही कर्णधार विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया अतिशय साधारण होती. त्याच्यासारख्या खेळाडूकडून अशा प्रकारची विधाने अपेक्षित नाहीत. भारतीय संघाची देहबोली खालावलेली असून कोहलीच्या विचारांतही स्पष्टता दिसत नाही. या परिस्थितीत ‘ड्रेसिंग रूम’मधील इतर खेळाडूंचे मनोबल वाढवणे अवघड आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि प्रेरक महेंद्रसिंह धोनीने पुढाकार घेत खेळाडूंशी संवाद साधला पाहिजे. – कपिल देव

भारतीय खेळाडूंमध्ये कौशल्य असून द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये ते उत्तम खेळ करतात. मात्र, मोठ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या सामन्यांत तुम्ही पुढाकार घेत दमदार कामगिरी करणे गरजेचे असते. या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचे महत्त्व होते. मात्र, असे सामने जिंकण्यासाठी आवश्यक मानसिक कणखरता मला भारतीय खेळाडूंमध्ये दिसली नाही. – गौतम गंभीर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohli new zealand defamatory defeat twenty20 cricket world cup akp

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या