Virat Kohli Emotional Reaction On 2019 World Cup Loss: भारताचा माजी खेळाडू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. यादरम्यान त्याला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. एका आयसीसी विश्वचषकातील पराभवा हा विराटच्या जिव्हारी लागला होता, यातून तो कसा सावरला, याबद्दल त्याने स्वत: सांगितलं आहे.

सलग दोन टी-20 वर्ल्डकप जेतेपदं आणि त्यानंतर मिळालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाने भारताचा प्रदीर्घ काळ चाललेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. मात्र, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाची जखम आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजी आहे. रोहित शर्मा आजही त्या पराभवाबद्दल बोलताना दिसतो. मात्र, विराट कोहलीसाठी २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेला सेमीफायनलमधील पराभव त्याहूनही अधिक वेदनादायी होता.

२०१९ च्या वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना दोन दिवस रंगला होता. मँचेस्टरमध्ये झालेल्या या सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणल्याने न्यूझीलंडच्या डावातील ४७व्या षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सामना पुन्हा सुरू झाला आणि न्यूझीलंडने ८ विकेट्स गमावत २३९ धावा केल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १८ धावांनी मागे राहिला. या पराभवाची आठवण झाली की आजही सर्वात आधी आठवतो तो एमएस धोनीचा रनआउट. सामन्याच्या ४९व्या षटकात मार्टिन गप्टिलने केलेला तो थरारक रनआउट भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला होता. या सामन्यात तीन विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा पराभव ‘हृदय पिळवटून टाकणारा’ असल्याचं म्हटलं होतं. विराट कोहलीनेही त्याच्याशी सहमती दर्शवली. इतकंच नाही, तर या पराभवानंतर आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलो होतो, अशी कबुलीही कोहलीने दिली.

विराट कोहली २०१९ च्या सेमीफायनलमधील पराभवाबाबत काय म्हणाला?

भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी जिओ स्टारला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने २०१९ च्या त्या सामन्याची आठवण सांगितली, “२०१५ च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तुम्हाला तुमची ताकद आणि कमकुवत बाजू चांगल्या प्रकारे माहीत असतात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं नेहमीच कठीण असतं. त्यांनी मोठी धावसंख्या उभारली तर आपल्यासाठी अडचण निर्माण होईल, हे आम्हाला माहीत होतं आणि नेमकं तसंच घडलं. त्यांनी अप्रतिम खेळ केला.”

“पण २०१९ आमच्यासाठी मोठा धक्का होता. २४० धावांचं लक्ष्य… त्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला. जर त्याच दिवशी सामना पूर्ण झाला असता, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूसह उतरले. परिस्थिती त्यांच्या बाजूने होती आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेत आम्हाला दबावाखाली आणलं. आमच्या मनात असलेल्या संभ्रमाचाही त्यांनी फायदा घेतला. तो पराभव स्वीकारणं आणि त्यावर प्रक्रिया करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यानंतर काही महिने मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हरवून गेलो होतो,” असं विराट कोहलीने सांगितलं.