आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचे विक्रम कोण मोडणार?? या प्रश्नावर गेली अनेक वर्ष चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म पाहता, तो सचिनचे विक्रम मोडण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे सचिन सर्वोत्तम की विराट ही चर्चा क्रिकेट प्रेमींमध्ये नेहमी रंगताना दिसते. भारतीय कसोटी संघाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने या चर्चेवर आपलं उत्तर दिलं आहे.

माझ्या दृष्टीकोनातून विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज आहे, इशांत Cricbuzz संकेतस्थळाशी बोलत होता. न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत इशांत शर्माने पहिल्या सामन्यात आश्वासक कामगिरी केली होती. पहिल्या डावात इशांतने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. मात्र या कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं.

दरम्यान कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताला लवकरात लवकर नवीन जलदगती गोलंदाज शोधणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. “इशांत शर्मा – मोहम्मद शमी आणि उमेश यादव या गोलंदाजांचं वयोमान पाहता ते पुढील काही वर्षांपर्यंत पहिल्यासारखी कामगिरी करतील हे सांगता येत नाही.” सध्या भारतात करोना विषाणूमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

अवश्य वाचा – करोनामुळे क्रिकेटवर अवकळा : असा आहे भारताचा उर्वरित महिन्यांचा कार्यक्रम