टीम इंडियाने अखेर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ बुधवारी रात्री अबुधाबीमध्ये अफगाणिस्तान संघाचा पराभव करून फॉर्मात परतला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानासमोर अफगाणिस्तानचा संघ टिकू शकला नाही आणि २० षटकात ७ विकेट गमावून केवळ १४४ धावाच करू शकला. सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणि विशेषतः कर्णधार विराट कोहलीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. सामना संपल्यानंतर तो काय म्हणाला ते जाणून घेऊया.

दिवाळीच्या आधी अफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ”हा एक खेळ आहे, आम्ही वेळेनुसार अनेक निर्णय घेतो. वरच्या फळीतील तीन फलंदाज निश्चितच असतात, पण आम्ही पुढे जाऊन निर्णय घेतो. याचे श्रेय विरोधी संघाला द्यावे लागेल. प्रामाणिकपणे सांगायचे, तर नेट रन रेट माझ्याही मनात होता. आम्हाला सकारात्मकतेने पुढे जायचे आहे, पुढे काय होते ते पाहू.”

विराटने अश्विनचे ​​कौतुक करत म्हटले, “अश्विनच्या पुनरागमनामुळे खूप आनंद झाला आहे. त्याने खूप मेहनत घेतली आहे, त्याला परत पाहून मला खूप आनंद झाला आहे. तो एक स्मार्ट गोलंदाज आहे.” अश्विनने या सामन्यात ४ षटकात १४ धावा देत २ बळी टिपले.

हेही वाचा – VIDEO : अफगाणिस्तानच्या ‘वजनदार’ खेळाडूला धडकला हार्दिक पंड्या; ट्विटरवर उठला मीम्सचा बाजार!

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताने मागील सामन्यात केलेली चूक सुधारली. केएल राहुलसोबत रोहित शर्मा पुन्हा एकदा सलामीला आला आणि दोन्ही फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. या सलामीच्या जोडीने १४० धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ धावा, तर केएल राहुलने ४८ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी केली. रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या, तर हार्दिक पंड्यानेही यावेळी मनमोकळेपणाने फलंदाजी करत १३ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.