कांगारुंच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आता केवळ २४ तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारतीय कसोटी संघ गुरूवारी ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली उल्लेखनीय कामगिरीची नोंद करणारा भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. संघाची रणनीती आणि सुरू असलेल्या तयारीबाबतची माहिती कोहलीने आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला गृहित धरून चालणार नाही, असे कोहलीने सांगितले. याशिवाय त्याने प्रतिस्पर्धी संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचेही कौतुक केले. मिचेल स्टार्कची गोलंदाजी, त्यांची बलस्थाने आणि कच्चेदुवे अशी विविध मुद्द्यांवर कोहलीने भाष्य केले.

मिचेल स्टार्कला जेव्हा मी मागच्या वेळेस पाहिले होते तेव्हा त्याने आपल्या गोलंदाजी कौशल्यात खूप प्रगती केल्याचे मला स्पष्ट जाणवले होते. आपल्या गुणवैशिष्ट्यांवर आणखी मेहनत घेऊन तो आज वर्ल्डक्लास गोलंदाज झाला आहे. मी त्याचा खूप आदर करतो. त्याच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे, असे कोहली म्हणाला.

बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांचा अनुभव यावेळी नक्कीच कामी येईल, असा विश्वासही कोहली व्यक्त केला. संघाला आपल्या क्षमतांची पूर्ण जाणीव असून आम्ही आमच्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. ऑस्ट्रेलियाच्यासारख्या संघाचे आव्हान गृहित धरून चालणार नाही, असेही कोहली पुढे म्हणाला. संघाची रचना आणि संयोजन याबाबत आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत. त्यामुळेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठीचा संघ यावेळी कायम राखण्यात आला असल्याचे कोहलीने सांगितले.