“शेवटी धोनीचे खूप आभार, ज्यानं…”, टेस्ट कॅप्टनशिप सोडणाऱ्या विराटनं पोस्टमध्ये केला ‘कॅप्टन कूल’चा उल्लेख!

एका पोस्टच्या माध्यमातून विराटनं आपला ‘मोठा’ निर्णय सर्वांना कळवला, यात त्यानं धोनीचे विशेष आभार मानले.

virat kohli quits test captaincy and thanked ms dhoni in his post
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने आज शनिवारी कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. विराटने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारीच संपली. भारताने मालिका १-२ने गमावली. दोन सामन्यात विराटने तर एका सामन्यात केएल राहुलने कर्णधारपद भूषवले होते. त्याने यापूर्वीच टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आपल्या पोस्टमध्ये शेवटी विराटने महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले.

विराट कोहलीने लिहिले, “सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.”

विराट कोहलीने शेवटी महेंद्रसिंह धोनीचे विशेष आभार मानले. त्याने लिहिले, “शेवटी एमएस धोनीचे खूप आभार, ज्याने माझ्यावर कर्णधार म्हणून विश्वास ठेवला आणि मला भारतीय क्रिकेटला पुढे नेणारी एक सक्षम व्यक्ती म्हणून ओळखले.”

हेही वाचा – ‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट!

टी-२० विश्वचषक २०२१ पूर्वी, त्याने टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली होती. अशा परिस्थितीत विराटकडे केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद होते आणि आता तो कर्णधारपदाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त झाला आहे. आयपीएलमध्येही तो यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचा कर्णधार म्हणून खेळणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli quits test captaincy and thanked ms dhoni in his post adn

Next Story
‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी