scorecardresearch

“मला भारतीय संघांमध्ये सरळ सरळ दोन गट दिसतायत, एक मुंबईचा आणि…”; पाकिस्तानी खेळाडूचं विश्लेषण

विराटने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेणं हा सुद्धा एक संकेत असल्याचं मत या पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केलं आहे.

Team India
भारतीय संघांमध्ये मतभेद असल्याची शंका (फोटो विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार)

भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या विराट कोहली नुकताच आपल्या पदावरुन पायउतार झाला. यानंतर न्यूझीलंडविरोधातील आगामी मालिकेसाठी रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आलं आहे. मात्र विराटने कर्णधार पद सोडणं हे भारतीय क्रिकेटसाठी चिंतेची बाब असल्याचं मत पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने व्यक्त केलंय.

विराटने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेणं हे ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही सुरळीत नाहीय असं दर्शवत आहे, असं मत पाकिस्तानचा माजी कसोटीपटू मुश्ताक अहमदने व्यक्त केलं आहे. तसेच बायो-बबलमुळे भारतीय संघातील खेळाडूंवर ताण आला आणि त्यामुळेच संघाची कामगिरी खालावल्याने ते स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्याचंही मुश्ताकने म्हटलं आहे.

“जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की त्याला कर्णधारपद सोडायचं आहे तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये काहीतरी गडबड असल्याचा तो संकेत असतो. भारतीय ड्रेसिंग रुममध्ये मला सध्या सरळ सरळ दोन गट दिसत आहेत. एक मुंबई गट आणि दुसरा दिल्लीचा गट,” असं मुश्ताकने म्हटलं आहे. मुश्ताक सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासंदर्भातील कार्यक्रमाचा भाग आहे.

“मला वाटतं कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्ती घेईल. तो देशासाठी खेळणार नाही. तो आयपीएलमध्ये खळत राहील. त्याचं या फॉरमॅटमधील क्रिकेट खेळून झाल्यासारखं वाटतंय मला,” असंही मुश्ताक म्हणाला आहे.

भारताच्या वाईट प्रदर्शनाबद्दल बोलताना मुश्ताकने आयपीएलला दोष दिलाय. “मला वाटतं की आयपीएलमुळेच यंदा टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. भारताचे खेळाडू बराच काळ बायो-बबलमध्ये आहेत. विश्वचषकाच्या पूर्वीपासून ते बायो बबलमध्ये असून त्यामुळे त्यांना थकवा, मरगळ आल्यासारखं झालं असावं ज्याचा परिणाम खेळावर झाला,” असं मुश्ताक म्हणालाय.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही भारतीय संघातील खेळाडूंवर बायो-बबलचा नकारात्मक परिणाम झाल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 14:01 IST

संबंधित बातम्या