पीटीआय, बंगळूरु
गतविजेतेपद राखायचे असेल, तर जागे व्हा. सरावाचा प्रत्येक मिनिटही वाया घालवू नका, असे आवाहन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने शनिवारी आपल्या सहकार्यांना केले आहे.
संघाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान कोहलीने संघ सहकार्यांशी संवाद साधला. ‘आयपीएल’ २०२६च्या हंगामात बंगळूरु आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध करणार आहे. ‘‘आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे आहे. आता एकही दिवस वाया घालवायचा नाही. आपल्याला इतरांपेक्षा पुढे राहायचे आहे. त्यामुळे सतर्क राहा. आपण ज्या सत्राचा भाग आहोत, त्यातील एक मिनिटही वाया घालवू नका. पुढच्या अडीच महिन्यांसाठी आपण आपले १२० टक्के योगदान दिले पाहिजे,’’ असे कोहली म्हणाला.
बंगळूरुने लिलावात वेंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल आणि सा्त्विवक देसवाल यांना संघात सामील केले आहे. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी लिलावानंतर तयार झालेल्या संघाबद्दल समाधान व्यक्त करताना फ्रँचायझीने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संघ मजबूत केला असल्याचे म्हटले आहे.
संघासमोर नवीन आव्हान – फ्लॉवर
’‘‘संघ गेल्या यशावर विसंबून न राहता नवीन आव्हानाचा स्वीकार करेल. यंदा एक फरक आहे, आमच्या नावापुढे गतविजेत्याचे बिरुद आहे. सर्व बंगळूरुच्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची भावना आहे. पण तो हंगाम संपला आहे.
’आमच्यासमोर एक नवीन आणि रोमांचक आव्हान आहे. आम्ही यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा जिंकण्यासाठी येथे आलो आहोत. विजेतेपद राखण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे अँडी फ्लॉवर म्हणाले.
’‘‘नव्या हंगामात मोहिमेची सुरुवात घरच्या मैदानावर होत असल्याचा फायदा आम्हाला होणार आहे. पहिल्या सामन्यापासूनच लय पकडण्याची संधी आम्हाला आहे. मैदान अतिशय सुंदर दिसत आहे,’’ असे फ्लॉवर यांनी सांगितले.
