सध्या सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी ट्रेंड होत असतात. आयपीएल सुरू असल्यामुळे आयपीएलचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. क्रिकेट चाहते आणि क्रिकेटपटू यांच्यातील अंतर आणखी कमी व्हावं, यासाठी सर्व फ्रँचायझी आपल्या खेळाडूंचे सराव कर असतानाचे किंवा सामन्यानंतर झालेल्या मजेशीर संवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामुळे खेळाडूंमध्ये नेमकी काय चर्चा होते, हे क्रिकेट चाहत्यांना समजतं. पण विराट कोहली याच्या विरोधात आहे. विराटने आयपीएल स्पर्धेतील ‘कन्टेन्ट कल्चर’ वर मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून विराट कोहली या स्पर्धेचा भाग आहे. ही स्पर्धा कशी बदलत गेली, हे विराटने खूप जवळून पाहिलं आहे. सुरुवातीला सोशल मीडियाचा इतका क्रेझ नव्हता. त्यामुळे आपल्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते स्टेडियमबाहेर किंवा हॉटेलबाहेर तुफान गर्दी करायचे. पण आता सोशल मीडियामुळे क्रिकेट चाहते आणि क्रिकेटपटू यांच्यातील अंतर खूप कमी झालं आहे. खेळाडू कुठे जातात, सरावादरम्यान नेमकं काय होतं, हे सोशल मीडियावर सहज पाहायला मिळतं. प्रत्येक संघाचं सोशल मीडियावर अकाउंट आहे. या अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात.

प्रत्येक संघाचं सोशल मीडिया अकाउंट आहे. हे अकाउंट मॅनेज करण्यासाठी एक स्वतंत्र टीम असते, जी व्हिडिओ शूट करण्यापासून ते शेअर करण्यासह सर्व काही काम पाहते. विराटने याबाबत भाष्य केलं आहे, विराट म्हणाला, मैदानावर एन्ट्री करताच ते कॅमेरा घेऊन मागे फिरतात. हे विराटला मुळीच आवडत नाही.

मयंती लंगरला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला, “सराव करायला जाताच, ६ कॅमेरामन फॉलो करतात. ही सामान्य गोष्ट नाही. एक खेळाडू म्हणून इतकं तरी स्वातंत्र्य हवं की शांत होऊन खेळावर लक्ष केंद्रित करता येईल. मी माझ्या सरावादरम्यान असं काहीच करू शकत नाही, जे मला करायचं आहे. कारण मला माहीत आहे, जर ते रेकॉर्ड झालं तर दुसऱ्या दिवशी माझ्या सराव सत्रावरून चर्चा होईल.”