Virat Kohli Instagram Post Viral On Internet : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतला. कोहलीने फक्त १४ धावा केल्याने तो या मोठ्या टूर्नामेंटमध्ये धावांचा पाऊस पाडण्यात अपयशी ठरला आहे. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विराट झेलबाद झाला. विराटने खराब कामगिरी केल्यामुळं भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं. बाद झाल्यानंतर कोहली सहकारी खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुममध्ये मस्ती करताना दिसला. या कारणामुळं चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि सोशल मीडियावर विराटला ट्रोल केलं. त्यानंतर विराटनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय.
विराटने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, “दुसऱ्यांच्या मतप्रदर्शनातून स्वत:ला मुक्त करण्यासाठी तुम्हाला नापसंत करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.” भारताच्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने विराटला बाद केलं. स्टार्कने त्याच्या षटकातील दुसरा चेंडू वेगात फेकला आणि त्या चेंडूने खेळपट्टीवरून उसळी घेतल्याने विराटने सावध खेळी केली. परंतु, चेंडू बॅटला लागल्याने थेट स्लिपमध्ये गेला आणि स्मिथने विराटचा झेल पकडला. कोहली बाद झाल्यानंतर स्टेडियममधील चाहते शांत झाले.
विराट बाद झाल्यानंतर सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कोहली बॅकफूटवर जाऊन तो चंडू खेळला असता, तर नक्कीच बाद होण्यापासून वाचला असता. कोहली हा चेंडू खेळण्यासाठी फ्रंट फूटवर आला. त्यानंतर उसळी घेतलेल्या पासून बचाव करण्याचा कोहलीला वेळच मिळाला नाही. स्टार्कचा चेंडू कोहलीला मिस करता आला नाही. शेवटच्या क्षणी त्याला सावध खेळी करता आली नाही. जर तो बॅकफूटवर असता तर त्याची विकेट गेली नसती.
विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत ट्वीटरवर प्रतिक्रियांचा वर्षाव
आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात खेळाडूंना ट्रोल करणं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाहीय. या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळं आगामी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी असेल, यावर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, विराट कोहली खरंच जादूगार आहे, कारण जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते, त्यावेळी तो गायब होतो. तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, कधीही सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करु नका.