भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कारकीर्दीत एक असा टप्पा होता, जेव्हा त्याला पाठदुखीचा भयंकर त्रास होत होता. पण भारताचे माजी फिटनेस प्रशिक्षक बासू शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो यातून बरा झाला. शंकर यांच्या ‘१००, २०० प्रॅक्टिकल अॅप्लिकेशन्स इन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग’ या पुस्तकाच्या अग्रलेखात, बासू यांनी वजन उचलण्यास कसे प्रेरित केले, ज्यामुळे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्यास मदत झाली, याबाबत विराटने खुलासा केला आहे.

विराटने लिहिले, ‘२०१४च्या शेवटच्या महिन्यांत मला पाठदुखीचा त्रास होत होता आणि ही दुखापत बरी होत नव्हती. दररोज सकाळी माझी पाठ मोकळी करण्यासाठी मला ४५ मिनिटे व्यायाम करावा लागला, पण दिवसा काही वेळा मला पाठ दुखायची. या नंतर बासू सर आणि मी वजन उचलण्याविषयी आणि माझ्या शरीराची पूर्ण शक्ती परत मिळवण्याबद्दल बोललो.”

२०१५ ते २०१९ या कालावधीत भारतीय संघासोबत काम करणाऱ्या शंकर यांनी कोहली आणि भारतीय संघाच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट म्हणाला, ”आधी मला याबद्दल खात्री नव्हती (वजन उचलणे) पण बासू सरांनी मला फक्त विश्वास ठेव ही एकच गोष्ट सांगितली. मला त्याच्या ज्ञानावर आणि अनुभवावर पूर्ण विश्वास होता.”

हेही वाचा – PBKS vs RR : आज कोण मारणार दुबईचं मैदान?; वाचा कोणत्या संभाव्य खेळाडूंसह उतरणार पंजाब आणि राजस्थान

“मला २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्धची मालिका आठवते. मी बासू सरांकडून वजन उचलण्यास शिकण्यास सुरुवात केली. त्याबद्दल केलेला अभ्यास मला समजला आणि मी काहीतरी आश्चर्यकारक करण्याच्या दिशेने काम करत आहे, हेसुद्धा जाणवले. त्याचे परिणाम अभूतपूर्व होते, ज्यामुळे माझ्या शरीराच्या सामर्थ्याबद्दलची धारणा बदलली”, असेही विराटने लिहिले.

क्रिकेटविश्वात विराट हा सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो, मैदानातील त्याची चपळता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. याच तंदुरुस्तीमुळे विराट सातत्याने सामने खेळतो. सध्या विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील सामना आरसीबीने गमावला. या हंगामानंतर तो कर्णधारपद सोडणार आहे शिवाय यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर तो टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व दुसऱ्याच्या हाती देईल.