Virat Kohli target ODI World Cup 2027 statement: आपल्या जबरदस्त कामगिरीने क्रिकेट विश्वात धुमाकूळ घालणारा टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावत त्याने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. २०२७ चा विश्वचषक नजरेसमोर ठेवून फिटनेस जपत आक्रमक फलंदाजीचा पवित्रा घेत विराट कोहली मैदानावर खेळताना दिसतो. पण याच २०२७ विश्वचषकासाठी विराट कोहलीचं काय टार्गेट आहे, जाणून घेऊया.
विराट कोहलीने आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना, २०२७ च्या विश्वचषकासाठीच्या आपलं काय टार्गेट आहे विचारलं असता, त्याने मोकळेपणाने आपली इच्छा व्यक्त केली. आयसीसीने १ ऑक्टोबरला वनडे विश्वचषक २०२७चं वेळापत्रक जाहीर केलं. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्याने या मोठ्या स्पर्धेला सुरूवात करणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या जोडगोळीचा अखेरचा विश्वचषक असलेल्या या स्पर्धेवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहलीला आगामी वनडे वर्ल्डकपसाठी त्याचं टार्गेट काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोहलीने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देणारी खेळी खेळण्याचं आपलं स्वप्न असल्याचं सांगितलं. किंग कोहली म्हणाला, “माझं स्वप्न आहे की फायनलमध्ये मॅचविनिंग खेळी करावी. उदाहरणार्थ, लक्ष्याचा पाठलाग करताना सामना फिनिश करावा. माझ्यासाठी हीच आदर्श परिस्थिती असेल,” असं विराट कोहलीने सांगितलं.
कोहलीच्या मते, २०२७चा वनडे वर्ल्डकप हा भारतासाठी त्याचा अखेरचा वर्ल्डकप असेल. त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकण्याची त्याची इच्छा आहे आणि वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाने ट्रॉफी जिंकणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
“मॅचविनिंग खेळी करता आली, असं घडलं तर खूप छान. पण जर तसं झालं नाही आणि आपण वर्ल्डकप जिंकलो, तरी मी तितकाच आनंदी असेन. कारण शेवटी, तुमच्यातील स्पर्धात्मक वृत्ती कितीही तीव्र असली, तरी हा शेवटचा वर्ल्डकप खेळण्याची संधी आहे, याची तुम्हाला जाणीव असते. त्यामुळे ट्रॉफी जिंकणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,” असं कोहली म्हणाला.
“मला अशी संधी मिळाली तर… एक फलंदाज म्हणून मैदानावर उभं राहून संघासाठी अशी कामगिरी करण्यापेक्षा समाधान देणारी दुसरी गोष्ट नाही. हाच विचार आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. संघ कठीण परिस्थितीत आहे आणि आपण त्या संकटातून बाहेर काढतोय, अशी कल्पना तुम्ही करता. हाच विचार तुम्हाला या स्तरावर खेळण्यासाठी आणि स्पर्धा करण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे माझ्यातली ही स्पर्धात्मक वृत्ती मी सोडू इच्छित नाही. पण हो, त्यापेक्षा मोठं उद्दिष्ट नेहमीच महत्त्वाचं असतं,” असंही कोहलीने स्पष्ट केलं.
