भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. त्यामुळे नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पण इंग्लंडमध्ये उतरताच टीम इंडियाला विराट कोहली आणि रोहित शर्माची उणीव भासली.
२०११ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंडला पोहोचला आहे. दोन्ही वरिष्ठ फलंदाजांनी आता कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. दोघांनीही गेल्या आठवड्यात कसोटी क्रिकेटला रामराम केला. यासह बीसीसीआयने नवीन संघाची निवड केली. इंग्लंडमध्ये या नवख्या भारतीय संघाचा निभाव कसा लागणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचताच, संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची उणीव भासली. विमानतळावर भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी मीडिया किंवा चाहते कोणीच उपस्थित नव्हते. याआधी जेव्हा जेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली आहे तेव्हा चाहते आणि माध्यमांनी नेहमीच त्यांचे स्वागत केले आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये विराट कोहली शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता तेव्हा चाहत्यांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले होते. एअरपोर्टपासून ते अॅडलेडच्या मैदानापर्यंत विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. रोहित आणि विराटला पाहण्यासाठी इतके चाहते आले होते की शेवटी टीम इंडियाला इनडोअर सराव करावा लागला होता. चाहत्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल किती क्रेझ होती यावरूनच दिसून येतं.
रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचला तेव्हा लंडनमध्ये असं काहीच दिसलं नाही. गिल आणि कंपनी येताच संपूर्ण विमानतळ रिकामं होतं. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात चाहते म्हणत आहेत की असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, भारतीय पत्रकार विमल कुमार म्हणाले, “एकही चाहता किंवा मीडियामधील व्यक्ती इथे उपस्थित नव्हते.”
कोहली आणि रोहितच्या निवृत्तीमुळे कसोटी क्रिकेट पाहण्याचा तो आनंद कमी झाल्याचे चाहते म्हणत आहेत, तर काहींना “भारतीय कसोटी क्रिकेटचा उतरता काळ” सुरू झाल्याची भीती वाटत आहे. यासह आता इंग्लंडमध्ये गिलच्या नेतृत्त्वाखालील संघाला जर चाहत्यांचा पाठिंबा मिळवायचा असेल तर काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे.