Rajat Patidar Six and Virat Kohli Reaction Viral:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा ९२ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता आरसीबीचा संघ ३१ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. आरसीबीच्या पहिल्या क्वालिफायरमधील विजयाचा हिरो ठरला रजत पाटीदार. रजत पाटीदारने नाबाद ९३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठं योगदान दिलं. यादरम्यान त्याच्या षटकारांच्या आतिषबाजीवर विराट कोहलीची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने कर्णधाराला साजेशी खेळी करत ३३ चेंडूंमध्ये नाबाद ९३ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे आरसीबीला आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यास मदत झाली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावांचा डोंगर उभारला. आपल्या खेळीदरम्यान रजत पाटीदारने एक षटकार मारून विराट कोहलीसह स्टेडियममधील सर्वांना आश्चर्यचकित केलं.

डावाच्या १७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारने सर्वांना चकित करणारा उत्तुंग षटकार खेचला. त्याआधी त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर षटकातील त्याने चौथ्या चेंडूवरही षटकार खेचला. समालोचक रवी शास्त्रीदेखील हा फटका पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी याला आतापर्यंतच्या सामन्यातील सर्वोत्तम शॉट असल्याचं घोषित केलं.

रबाडाने हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चांगल्या लेंथवर टाकला. बॅकफूटवर उभा असलेल्या पाटीदारने कव्हर्सवरून एक जोरदार षटकार मारला. या शॉटवर विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रजत पाटीदारचा हा बॅकफूटवर जाऊन मारलेला षटकार पाहून विराटने तर तोंडावर हातच ठेवला आणि इतर सर्वही त्याचा फटका पाहून आनंद साजरा करत होते.

या सामन्यात रजत पाटीदारने अवघ्या २१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील हे संयुक्तपणे तिसरं सर्वात जलद अर्धशतक आहे. रजत पाटीदार व्यतिरिक्त, वीरेंद्र सेहवागने २०१४ मध्ये वानखेडेवर चेन्नईविरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. २०१३ मध्ये ड्वेन स्मिथनेही चेन्नईविरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. आयपीएल प्लेऑफमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.