Virat Kohli Reaction on Tim David Six Video: आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरूच्या घरच्या मैदानावर सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत दिल्लीने आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. चांगल्या सुरूवातीनंतर आरसीबीचा संघ या सामन्यात फलंदाजी करताना १७५ धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान टीम डेव्हिडने उत्कृष्ट षटकार खेचला, या षटकारावरील विराट कोहलीची प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
साधारणतः अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टीम डेव्हिडला या सामन्यात लवकर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीच्या षटकात टिम डेविडने सरळ मैदानाच्या दिशेने असा जबरदस्त फटका मारला की चेंडू गोळीप्रमाणे सीमारेषेबाहेर गेला. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या विराट कोहलीची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली.
विराटने हा षटकार पाहताच जागेवर उडी मारली आणि टीम डेव्हिडचा तो षटकार पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. विराटची प्रतिक्रिया आणि टीम डेव्हिडचा तो षटकार पाहून जेकब डफी हसत होता. विराटबरोबर डफीची प्रतिक्रियादेखील या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. लुंगी एन्गिडी त्याच्या स्लोअर चेंडूमुळे चांगलीच भेदक गोलंदाजी करत आहे, यादरम्यान टीमचा हा षटकार कमाल होता. याशिवाय विराटने टीम डेव्हिडच्या षटकारावर अशी प्रतिक्रिया का दिली आणि त्याने फटका कसा खेळला याची अॅक्शनदेखील विराटने दाखवली.
दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट्स घेत यजमान संघाच्या धावांवर अंकुश ठेवला होता. विराट कोहली १९ धावांवर बाद झाला, तर फिल सॉल्टने चांगली खेळी करत २६ धावा केल्या, पण त्याला कुलदीप यादवने माघारी पाठवलं. देवदत्त पडिक्कलने काही चांगले फटके खेळले, मात्र तो १८ धावांवर झेलबाद झाला. दमदार फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रजत पाटीदारही या वेळी अपयशी ठरला आणि फक्त ८ धावा करू शकला.
डेथ ओव्हर्समध्ये RCB ने वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण संघाने गठ्ठ्याने विकेट्स गमावल्या आणि मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. टिम डेविडने ३ चौकार आणि १ षटकारासह २६ धावा केल्या, मात्र अक्षर पटेलने त्याला बाद केलं. शेवटच्या फलंदाजांनी थोडाफार हातभार लावत संघाचा डाव २० षटकांत १७५ धावांपर्यंत पोहोचवला. एकूणच, दिल्ली कॅपिटल्सने शिस्तबद्ध गोलंदाजी करत आक्रमकता आणि नियंत्रण यांचा उत्तम समतोल साधला.
