विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन फक्त वनडेंवर लक्ष केंद्रित करण्याच्या मुद्यावरून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी टीका केली आहे. विराटचे समकालीन जो रूट आणि स्टीव्हन स्मिथ धावांची टांकसाळ उघडत असताना विराटने मात्र कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. विराटने कसोटी क्रिकेट सोडायला नको होतं अशा शब्दांत मांजरेकरांनी आपल्या भावना व्य्क्त केल्या. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात कसोटी प्रकारात विराटच्या धावा होत नव्हत्या. त्यावेळी त्रुटींवर लक्ष देण्याऐवजी त्यांनी कसोटी प्रकारच सोडला असं मांजरेकर म्हणाले.
३७वर्षीय विराटने ऑस्ट्रेलियातल्या मालिकेनंतर या प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत विराटने १० डावात १९४ धावा केल्या. यापैकी १०० धावा एकाच डावात केल्या होत्या. विराटच्या कसोटी निवृत्तीने जगभरातल्या चाहत्यांना धक्का बसला होता. टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने टी२० प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विराट आता फक्त वनडे प्रकारात खेळतो.
एकाच कालखंडात खेळणाऱ्या, धावांच्या राशी ओतणाऱ्या चार समवयस्क खेळाडूंना फॅब फोर म्हटलं जातं. यामध्ये विराटसह न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट यांचा समावेश आहे. आधुनिक काळात कसोटी क्रिकेट उतरणीला लागलेलं असताना विराटने कसोटी प्रकाराला प्राधान्य दिलं. विराटने वनडे, टी२० तसंच आयपीएल या प्रकारांमध्ये खेळतानाच कसोटीत खोऱ्याने धावा काढल्या.
निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी विराटच्या नावावर कसोटी प्रकारात १२३ सामन्यात ४६.८५च्या सरासरीने ९२३० धावा आहेत. कसोटी प्रकारात १०,००० धावांचा टप्पा ओलांडणं हे विराटचं कारकिर्दीच्या सुरुवातीला ध्येय होतं. या विक्रमाच्या अगदी समीप असूनही विराटने निवृत्तीचा निर्णय घेतला.
‘जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यागणिक नवा विक्रम रचतो आहे. अशावेळी विराटचा विचार माझ्या मनात येतो. त्याने कसोटी प्रकारातून थेट निवृत्तीचाच निर्णय घेतला. निवृत्तीच्या आधीच्या पाच वर्षांमध्ये कसोटी प्रकारात धावांसाठी त्याला संघर्ष करावा लागला. त्याने खेळातल्या त्रुटींवर कसून मेहनत घेतली असती तर चित्र वेगळं असतं. या ५ वर्षात त्याची कसोटीची सरासरी ३१ एवढीच आहे’, असं मांजरेकर म्हणाले.
‘जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्हन स्मिथ यासारखी माणसं खोऱ्याने धावा करत आहेत. नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. अशावेळी विराटचं कसोटी न खेळणं खंतावतं’, अशा शब्दात मांजरेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हीडिओत मांजरेकरांनी आपलं मत मांडलं.
विराटने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेणं समजू शकतो. तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. पण त्याने वनडे क्रिकेटला प्राधान्य देत कसोटी क्रिकेट सोडलं याचं वाईट वाटतं. मधल्या फळीतील फलंदाजासाठी हा तुलनेने सोपा प्रकार आहे.
२०२० ते २०२५ कालावधीत विराटला धावांसाठी झगडावं लागलं. कोरोनापूर्व काळात ५०च्या सरासरीने खेळणाऱ्या विराटची बॅट रुसली. सलग तीन वर्ष तो शतकापासून दुरावला. ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूंनी त्याला चांगलंच सतावलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत, १० पैकी ९ वेळा तो ऑफस्टंपबाहेरचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
फॅब फोरपैकी बाकी तिघे कोरोनानंतरच्या काळात धावांच्या राशी ओतू लागले. रुटने मंगळवारी ४१व्या शतकाची नोंद केली. कसोटी प्रकारात सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याला खुणावतो आहे. स्टीव्हन स्मिथने अॅशेस मालिकेत शतक झळकावलं. त्याचं हे ३७वं कसोटी शतक आहे. मात्र त्याचवेळी विराटच्या नावामागे माजी खेळाडू अशी नोंद आहे.
कसोटी प्रकारात निवृत्त झाल्यानंतर विराट वनडेत खेळतो आहे. ३७व्या वर्षीही त्याचा फॉर्म आणि फिटनेस उत्तम असल्याचं त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दाखवून दिलं.
‘कसोटी क्रिकेट तुमची कसोटी पाहतं. विराटचा फिटनेस पाहता, तो अगदी सहज खेळत राहू शकला असता. त्याने त्याच्या उणिवांवार काम करायला हवं होतं. तो केव्हाही संघात पुनरागमन करू शकला असता. तो कसोटी प्रकारात खेळत राहिला असता तर मला प्रचंड आनंद झाला असता. रूट, स्मिथ शतकांवर शतकं झळकावत असताना विराटचं कसोटीत नसणं डाचतं, असं मांजरेकर म्हणाले.
