विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघ स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतून बाहेर पडला आहे. विराटची ही टी-२० संघाचा कप्तान म्हणून शेवटची स्पर्धा होती. त्याला आयसीसीचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याची संधी होती, पण ती हुकली. आता विराटला अजून एक धक्का बसला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या टी-२० क्रमवारीत विराट चार स्थानांनी घसरून आठव्या स्थानावर आला आहे. भारताच्या शेवटच्या सामन्यात कोहलीला नामिबियाविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या केएल राहुलला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो टॉप-५ मध्ये पोहोचला आहे.

बाबर पहिल्या स्थानी

सध्याच्या आयसीसी टी-२० क्रमवारीवर नजर टाकली तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामने गेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले होते. तो तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आहे, तर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान सहाव्या, न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉन्वे सातव्या, विराट कोहली आठव्या, इंग्लंडचा जोस बटलर नवव्या तर दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – ना विराट, ना रोहित..! कोणता फलंदाज सरस ठरेल, असं विचारताच डेल स्टेननं ‘दोन’ शब्दात दिलं उत्तर!

गोलंदाजीत हसरंगा अव्वल

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड गोलंदाजी क्रमवारीत ११ स्थानांनी प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ४ बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झम्पा टॉप-५ मध्ये पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने ५ विकेट घेतल्या होत्या. एकही भारतीय गोलंदाज टॉप-५ मध्ये नाही. श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये..

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या स्थानावर कायम आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या तर वानिंदू हसरंगा तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल तीन स्थानांच्या प्रगतीसह चौथ्या क्रमांकावर आहे. येथेही एकही भारतीय खेळाड़ू टॉप-१० मध्ये नाही.